कळवण तालुक्यात २७२ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:14 AM2021-03-28T04:14:07+5:302021-03-28T04:14:07+5:30
कळवण : तालुक्यात कोरोनाचा प्रसार गतीने होत असून उपाययोजनांसंदर्भात घेतलेल्या प्रशासकीय बैठका कागदावरच राहत आहेत. यामुळे शनिवारपर्यंतच्या शासकीय अहवालानुसार ...
कळवण : तालुक्यात कोरोनाचा प्रसार गतीने होत असून उपाययोजनांसंदर्भात घेतलेल्या प्रशासकीय बैठका कागदावरच राहत आहेत. यामुळे शनिवारपर्यंतच्या शासकीय अहवालानुसार कळवण शहरात ९९ कोरोनाबाधित रुग्ण असून तालुक्यात २७२ बाधित रुग्ण झाले आहेत. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना प्रशासकीय यंत्रणा मात्र कागदीघोडे नाचवत असल्याचे चित्र असून प्रशासनाने कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे.
गेल्या आठ दिवसांत तालुक्यात २११ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण भागात रुग्णसंख्या जास्त वाढत असल्याचे समोर आले आहे. शनिवारी आलेल्या अहवालानुसार कळवण तालुक्यात ४३ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली. यात ३९ रुग्ण ग्रामीण भागातील असून कळवण शहरात गेल्या आठ दिवसात ७५ रुग्ण आढळले.
कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात प्रशासनाकडून कळवण तालुक्यात चांगले काम झाले होते. दुसऱ्या टप्प्यात मात्र हलगर्जीपणा वाढला असून, जनतेने आपापली काळजी घ्यावी असेच प्रशासनास अभिप्रेत असल्याचे चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे. कोरोना कालावधीत अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहावे, असे आदेश असताना सहायक जिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी वगळता कळवण तालुक्यातील जवळपास सर्वच अधिकारी नाशिक येथून अपडाऊन करीत आहेत. यामुळे कोरोनासंदर्भात बैठका घेणे आणि निघून जाणे असे कामकाज सध्या सुरू आहे.