२७ तारखेला दोन चंद्र दिसण्याची निव्वळ अफवा
By Admin | Published: August 19, 2014 12:34 AM2014-08-19T00:34:12+5:302014-08-19T01:21:44+5:30
सोशल मीडिया : व्हॉट्स अप, फेसबुकवर पीक; विज्ञानविसंगत घटनांच्या प्रचाराद्वारे होतेय दिशाभूल
नाशिक : एका अनोख्या क्षणाचे साक्षीदार व्हा... अवघे जग त्या क्षणाची आतुरतेने वाट पहात असून, येत्या २७ तारखेला अवकाशात दोन चंद्र दिसणार आहेत, अन् असा योग पुन्हा २२८७ मध्ये पहावयास मिळणार असल्याने ही संधी चुकवू नका, असा संदेश सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून फिरत असून, तो अनेकांच्या भ्रमणध्वनीवरही येऊन आदळला असेल. मात्र प्रत्यक्षात तसे काहीही होणार नसून केवळ अफवा आहे. त्यामुळे त्यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहनच खगोलतज्ज्ञांनी केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर, विशेषत: फेसबुक व व्हॉट्स अपवर येत्या २७ तारखेला मध्यरात्रीच्या सुमारास अवकाशात दोन चंद्र दिसणार आहेत. असा योग पुन्हा २२८७ मध्ये जुळून येणार आहे, अशा आशयाचे छायाचित्र व मजकूर फिरतो आहे. यामध्ये, मंगळ ग्रह पृथ्वीच्या अगदी जवळ येणार असल्याने तो चंद्रासारखा अवकाशात साऱ्यांना पहाता येणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे २७ आॅगस्टच्या मध्यरात्री १२.३०च्या सुमारास चंद्र व मंगळ दोन्ही अवकाशात सहज पाहता येणार असल्याचे म्हटले आहे.
वास्तविक, असे काहीही होणार नसल्याचे खगोलतज्ज्ञांनी म्हटले आहे. मंगळ ग्रह हा पृथ्वीपासून अनेक कोटी किलोमीटरच्या अंतरावर आहे. त्यामुळे तो पृथ्वीच्या इतक्या जवळ तर नक्कीच येऊ शकत नाही की तो सहज नजरेने वा चंद्रासारखा दिसेल. चंद्र दिसतो कारण तो काही लाख अंतरावर आहे. तसेच तो पृथ्वीचा उपग्रह आहे, त्यामुळे तो दिसतो, असेही खगोलतज्ज्ञांनी सांगितले आहे.
त्यामुळे येत्या २७ तारखेला अवकाशात दोन चंद्र दिसतील ही केवळ अफवा असून, त्यास कोणताही वैज्ञानिक आधार नाही. त्यामुळे त्यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहनच खगोलतज्ज्ञांनी केले आहे.(प्रतिनिधी)