बुधवारी २७ उपवास पूर्ण ; उद्या चंद्रदर्शनाची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 01:15 AM2018-06-14T01:15:29+5:302018-06-14T01:15:29+5:30
मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असून, बुधवारी (दि.१३) २७ उपवास (रोजे) पूर्ण झाले. येत्या शुक्रवारी चंद्रदर्शनाची दाट शक्यता वर्तविली जात आहे. चंद्रदर्शन घडल्याची ग्वाही प्राप्त झाल्यास शनिवारी सकाळी सामूहिक नमाजपठण करून रमजान ईद साजरी करण्यात येईल.
नाशिक : मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असून, बुधवारी (दि.१३) २७ उपवास (रोजे) पूर्ण झाले. येत्या शुक्रवारी चंद्रदर्शनाची दाट शक्यता वर्तविली जात आहे. चंद्रदर्शन घडल्याची ग्वाही प्राप्त झाल्यास शनिवारी सकाळी सामूहिक नमाजपठण करून रमजान ईद साजरी करण्यात येईल. चंद्रदर्शनाबाबतची माहिती आणि त्याबाबतचा महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी विभागीय चांद समिती, सुन्नी मरकजी सिरत समितीची संयुक्त बैठक शुक्रवारी (दि.१५) संध्याकाळी जुन्या नाशकातील घासबाजार येथील शाही मशिदीत बोलविण्यात आली आहे. शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व धर्मगुरूंची बैठक होणार आहे. या बैठकीत चंद्रदर्शनाची ग्वाही आणि त्यानुसार ईद साजरी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, गुरुवारी व शुक्रवारी चंद्रदर्शन घेण्याचा मुस्लीम बांधवांनी प्रयत्न करावा, असे आवाहन चांद समितीचे हाजी सय्यद मीर मुख्तार अशरफी यांनी केले आहे. दरम्यान, उद्याचा शुक्रवार हा रमजान पर्वाचा ‘जुमातुल विदा’ राहणार आहे. अखेरचा शुक्रवार असल्याने नमाजपठणासाठी मशिदींमध्ये मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. बाजारपेठेत ईदच्या तयारीचे चित्र दिसू लागले आहे. बाजारपेठा गजबजल्या असून ईदनिमित्त तयार केला जाणारा ‘शिरखुर्मा’ खाद्यपदार्थासाठी लागणारा सुकामेवा व इतर साहित्याची खरेदी तसेच नवीन कपडे, पादत्राणे आदी सणाच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. ईदच्या नमाजपठणाचा मुख्य पारंपरिक सोहळा शनिवारी (दि.१६) साजरा होण्याची शक्यता लक्षात घेता शहरातील शहाजहॉँनी इदगाह मैदान सज्ज करण्यात येत आहे. मैदानाचे सपाटीकरण, इदगाहची रंगरंगोटी, पाण्याची व्यवस्था करण्यावर भर दिला जात आहे. एकूणच रमजान पर्वाची सांगता चंद्रदर्शन घडताच होणार असून पुढील उर्दू महिना शव्वालला प्रारंभ होणार आहे. शव्वालच्या १ तारखेला रमजान ईद साजरी करण्याची प्रथा आहे.
शब-ए-कद्र उत्साहात
मंगळवारी रात्री मुस्लीम बांधवांनी शहरात शब-ए-कद्र उत्साहात साजरी केली. रमजान पर्वातील अनन्यसाधारण धार्मिक महत्त्व असलेली रात्र म्हणून शब-ए-कद्र ओळखली जाते. या रात्रीनिमित्त मशिदींमध्ये नमाजपठण, कुराणपठण, दरुदोसलामचे पठण आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले. मशिदींवर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत नागरिकांनी मशिदींमध्ये थांबून प्रार्थना केली. तसेच बडी दर्गा, आनंदवली येथील दर्गा, पांडवलेणी दर्गा येथे मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली. मशिदींच्या विश्वस्तांकडून धर्मगुरूंचा सन्मान करण्यात आला.