२८ खत परवाने विक्री बंदचे आदेश
By Admin | Published: July 21, 2016 01:08 AM2016-07-21T01:08:05+5:302016-07-21T01:13:20+5:30
साडेनऊ लाखांचे बियाणे जप्त
नाशिक : खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळेवर खते व बियाणे मिळावे व बोगस बियाणे व खतांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत कार्यान्वित करण्यात आलेल्या भरारी पथकांना विविध ठिकाणी छापे टाकून २८ केंद्रांना खते व बियाणे विक्री बंदचे आदेश दिले आहेत. तसेच अनधिकृत आढळल्याने ९ लाख ५७ हजार रुपयांचे बियाणे जप्त करण्यात आल्याची माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली.
जिल्ह्णात खरिपाचे ६ लाख ५२ हजार २५७ हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यात जिल्ह्णासाठी रासायनिक खतांमध्ये २ लाख ६५ हजार ५०० मेट्रिक टन खतांची मागणी नोंदविण्यात आली होती. त्यात शासनाने २ लाख ११ हजार ५०० मेट्रिक टन खतांचे आवंटन जिल्ह्णासाठी मंजूर केले. जुलै २०१६ अखेर मंजूर १ लाख ३५ हजार मेट्रिक टन खतापैकी २० जुलै अखेर १ लाख २४ हजार ७८२ मेट्रिक टन खत उपलब्ध आहे. जिल्ह्णात शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार कृषी निविष्ठा मिळण्याकरिता व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर १ व तालुकास्तरावर १६ भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. या भरारी पथकामार्फत जिल्ह्णातील १०२४ विक्री केंद्रांची तपासणी करण्यात आली. तसेच आतापर्यंत ३२० बियाणे, खते व कीटकनाशकांचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. विक्री केंद्रांत त्रुटी आढळून आल्याने २८ ठिकाणी विक्री बंदचे आदेश देण्यात आले आहे. तसेच अनधिकृत बियाणे आढळल्याने ९ लाख ५७ हजार ४०५ रुपयांचे बियाणे जप्त करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)