जिल्ह्यात २८ लाख प्राधान्यक्रम कुटुंब; दीड लाख अंत्योदय कार्डधारकांना मोफत धान्याचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:14 AM2021-04-15T04:14:14+5:302021-04-15T04:14:14+5:30
नाशिक: राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना मोफत धान्य देण्याची घोषणा राज्य सरकारने केलेली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ...
नाशिक: राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना मोफत धान्य देण्याची घोषणा राज्य सरकारने केलेली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १७२३४८ अंत्योदय कार्डधारक तसेच २८,३५,,१३६ प्राधान्यक्रम कुटुंबांना मोफत धान्याचा लाभ होणार आहे. धान्य वाटपाबाबतचे अधिकृत आदेश अद्याप प्राप्त झालेले नसले तरी त्यादृष्टीने जिल्हा पुरवठा विभागाने तयारी सुरू केली आहे.
राज्यात कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय, व्यवहार बंद राहणार आहे. औद्योगिक क्षेत्रातील कारखाने सुरू राहणार असून खासगी कार्यालये बंद राहणार आहेत. त्यामुळे अनेकांच्या हाताचे काम कमी होणार असल्यामुळे त्यांच्यावर बेरोजगारीची वेळ येण्याची शक्यता आहे. अशावेळी त्यांना आर्थिक हातभार लावण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने पॅकेजची घाेषणा केेलेली आहे. त्यानुसार गोरगरिबांना अन्नधान्य मिळावे यासाठी राज्य सरकारने पुढील महिनाभर ३ किलो गहू आणि दोन किलो तांदूळ मोफत धान्य देण्याची योजना आखली आहे. त्याचा लाभ जिल्ह्यातील अंत्योदय तसेच प्राधान्यक्रम कुटुंबातील नागरिकांना होणार आहे.
--इन्फो--
जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेखालील लोकांची संख्या२८,२५,१९५
--इन्फो--
दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी
शासनाकडून मोफत धान्य योजना सुरू करण्यात आल्यामुळे रोटीचा प्रश्न काही प्रमाणात सुटणार आहे. परंतु रेशन दुकानदारांकडून योग्य ती माहिती दिली जात नसल्याने नेमके धान्य कोणत्या योजनेचे मिळते हे कळत नाही. त्यामुळे अनेकदा एका योजनेचा लाभ मिळत असताना हक्काचे दरमहा मिळणारे धान्य कमी मिळते. त्यामुळे योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहचावा ही अपेक्षा
- चिंतामण पारेसर, लाभार्थी.
मागील लॉकडाऊनमध्ये मोफत धान्य योजनेचा लाभ देण्यात आला. त्यामुळे आमच्या चुली पेटल्या. आता राज्य शासनाकडून मोफत धान्य दिले जाणार असल्याचे समजले. मागे चार महिने मोफत धान्य योजनेचा लाभ मिळेल असे सांगण्यात आले होते. परंतु शेवटच्या महिन्यात धान्य मिळालेले नाही. आता ही योजना केवळ एका महिन्यासाठी असल्याने योजनेतून पुरेपूर धान्य मिळाले पाहिजे.
- मालतीबाई घाटोळ, लाभार्थी
यावेळी अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरू आहेच मोफत धान्य देखील मिळणार असल्याने कामगार वर्गाची चिंता मिटणार आहे. प्रती व्यक्ती ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ दिले जाणार असल्याने संसाराला हातभार नक्कीच लाभेल. शासनाकडून दखल घेण्यात आल्याने निदान रोटी तरी मिळणार आहे
- शांताराम राऊत, लाभार्थी
--इन्फो--
महिनाभर मिळणार मोफत गहू, तांदूळ
राज्य शासनाने संचारबंदी लागू केल्यामुळे अनेक निर्बंध आले आहेत. याकाळात अनेकांच्या रोजगारावर परिणाम होणार असल्यामुळे त्यांच्या रोटीचाही प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना मोफत धान्य पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रतिव्यक्ती तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ याप्रमाणे मोफत धान्य पुरवठा केला जाणार आहे.
या योजनेचा लाभ अंत्योदय तसेच प्राधान्यक्रम कुटूंबातील सदस्यांना होणार आहे. जिल्ह्यात ७२३४८ अंत्योदय कार्डधारक तसेच २८,३५,,१३६ प्राधान्यक्रम कुटुंबातील सदस्य आहेत. या सर्वांना मोफत धान्याचा लाभ होणार आहे.