२८४ धोकेदायक घरांना नोटिसा
By admin | Published: July 20, 2016 12:34 AM2016-07-20T00:34:17+5:302016-07-20T00:34:37+5:30
महापालिका : दुरुस्तीबाबत रहिवाशांचे मात्र दुर्लक्ष
नाशिक : गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील काही धोकेदायक वाडे-घरे कोसळण्याच्या घटना घडत आहेत. महापालिकेने शहरातील सहाही विभागातील सुमारे २८४ धोकेदायक घरे-वाड्यांना नोटिसा बजावल्या असल्या तरी बव्हंशी रहिवाशांकडून दुरुस्तीबाबत गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याने नोटिसा केवळ उपचार ठरत आहेत.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सहाही विभागीय कार्यालयांमार्फत धोकेदायक घरे-झोपड्या यांना नोटिसा बजावल्या जातात आणि धोकादायक भाग उतरुन घेण्याच्या सूचना केल्या जातात. यंदाही सहाही विभागमिळून सुमारे २८४ घरे-वाडे यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मागील आठवड्यात पूर्व विभागातील मोदकेश्वर आसराची वेसजवळील भोसलेवाडा तसेच बुऱ्हड गल्लीतील वाड्याची भिंत कोसळण्याची घटना घडली, तर सोमवारी (दि.१८) पहाटे डिंगरआळीतील पोपडा वाड्याची भिंत कोसळली.
सुदैवाने जीवित हानी झाली नाही. पूर्व आणि पंचवटी विभागात सर्वाधिक जुने वाडे आहेत. या विभागातील धोकेदायक वाड्यांना दरवर्षी मनपामार्फत नोटिसा बजावल्या जातात, परंतु मालक-भाडेकरू वाद आणि न्यायप्रवीष्ट प्रकरणांमुळे रहिवाशांकडून दुरुस्तीबाबत गांभीर्याने घेतले जात नाही. पूर्व विभागातील काजीची गढी दिवसेंदिवस धोकादायक बनत चालली आहे. यंदाही पूर्व विभागाने काजीच्या गढीवरील ४९ धोकेदायक घरांना नोटिसा बजावल्या आहेत, परंतु लोक घरे सोडायला तयार नाहीत.
याशिवाय नदीकिनारी असलेल्या घरे व झोपड्यांनाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. पंचवटी विभागाने वाघाडी नदीलगत असलेल्या बुरुड डोह तसेच काळाराम मंदिर पूर्व दरवाजाकडील गोरक्षनाथ मंदिरानजीक असलेल्या सुमारे ८२ धोकेदायक झोपड्यांना नोटिसा बजावल्या आहेत. शहरात रविवार, दि. १० व ११ जुलै रोजी ११२ मि.मी. पावसाची नोंद झाल्याने धोकेदायक ठरलेल्या घरांच्या भिंती कोसळण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. महापालिकेने आपत्कालीन स्थितीत निवारागृह उपलब्ध करून दिले असून, रहिवाशांनी धोकेदायक घरे उतरुन घ्यावीत अथवा दुरुस्त करावित, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)