‘कॅट्स’मधून २९ वैमानिक देशसेवेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 12:34 AM2019-05-12T00:34:05+5:302019-05-12T00:34:30+5:30
भारतीय सैन्य दलाचा कणा मानल्या जाणाऱ्या ‘कॅट्स’च्या तळावरून लढाऊ वैमानिकांच्या ३१व्या तुकडीचे २९ वैमानिक, सहा प्रशिक्षक देशसेवेत दाखल झाले. दिमाखदार सोहळ्यात वैमानिक व प्रशिक्षकांना ‘एव्हिएशन विंग’ व ‘एव्हिएशन इन्स्ट्रक्टर बॅज’ प्रदान करण्यात आले.
नाशिक : भारतीय सैन्य दलाचा कणा मानल्या जाणाऱ्या ‘कॅट्स’च्या तळावरून लढाऊ वैमानिकांच्या ३१व्या तुकडीचे २९ वैमानिक, सहा प्रशिक्षक देशसेवेत दाखल झाले. दिमाखदार सोहळ्यात वैमानिक व प्रशिक्षकांना ‘एव्हिएशन विंग’ व ‘एव्हिएशन इन्स्ट्रक्टर बॅज’ प्रदान करण्यात आले.
गांधीनगर येथील ‘कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल’चा (कॅट्स) दीक्षांत सोहळा शनिवारी (दि. ११) पार पडला. युद्धजन्य परिस्थितीत हेलिकॉप्टर चालविणे, शत्रूवर हवाई हल्ला करणे, भूदलाला रसद पुरविणे, जखमींना सुरक्षितपणे उपचारार्थ तत्काळ हलविणे आदी बाबींचे शास्त्रशुद्ध सैनिकी लढाऊ हेलिकॉप्टर चालनाचे प्रशिक्षण या केंद्रातून प्रशिक्षणार्थींना देण्यात आले. वैमानिकांचा दीक्षांत सोहळा लष्करी थाटात पार पडला. या सोहळ्याचे प्रमुख अतिथी स्कूल आॅफ आर्टिलरी, देवळालीचे लेफ्टनंट जनरल रणबीरसिंग सलारिया होते.
चित्ता, चेतक, धु्रव या लढाऊ हेलिकॉप्टर्सच्या साक्षीने व चित्तथरारक युद्ध प्रात्यक्षिकांनी रंगलेला ‘कॅट्स’च्या दीक्षांत सोहळ्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. सैनिकी ब्रास बॅण्ड पथकाच्या तालावर प्रशिक्षणार्थी जवानांनी परेड सादर करत लष्करी अधिकाऱ्यांना ‘सॅल्यूट’ केला.
३२ वर्षांची वैभवशाली कामगिरी
प्रशिक्षण कालावधीत आपल्या कौशल्यपूर्ण अशा उत्कृष्ट कामगिरीबद्दल कॅप्टन अंकित मलिक यांना मानाची ‘सिल्व्हर चित्ता’, मेजर प्रभप्रित सिंग यांना ‘मेजर प्रदीप अग्रवाल’ स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. येथील केंद्राने आपल्या प्रशिक्षण कालावधीची ३२ वर्षे पूर्ण केली असून, ३३व्या वर्षात पदार्पण केले आहे. या कालावधीत अनेक प्रशिक्षित कौशल्यधिष्ठित लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिकांच्या तुकड्या येथून घडविल्या गेल्या आहेत. ‘कॅट्स’चा इतिहास वैभवशाली राहिला आहे.
‘आॅपरेशन विजय’
युद्धजन्य परिस्थितीत लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिकांची असलेली भूमिका ‘आॅपरेशन विजय’च्या प्रात्यक्षिकामधून उपस्थितांनी बघितली. ‘चित्ता’मधून रसदचा पुरवठा होताच सैनिकांनी शत्रूच्या दोन्ही तळांवर जोरदार हल्ला चढवून अवघ्या काही क्षणात त्यांच्या छावण्या उद्ध्वस्त केल्या. अल्पावधीत शत्रूवर विजय मिळविताच सैनिकांनी तिरंगा फडकावून सलामी दिली. जखमी झालेल्या सैनिकांना पुन्हा ‘चेतक’च्या सहाय्याने तत्काळ रुग्णालयात हलविण्यात येते. या युद्धजन्य प्रात्यक्षिक सोहळ्याने उपस्थितांच्या अंगावर शहारे आले.
धाडस व कौशल्याच्या जोरावर उड्डाण करणारा लढाऊ वैमानिक यशस्वी होतो. ‘एव्हिएशन स्कूल’चे उत्तम व्यासपीठ आहे. या केंद्राचा गौरवशाली इतिहास राहिलेला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कौशल्यपूर्ण वैमानिक येथून सातत्याने घडविले जात आहेत. शारीरिक व मानसिक आरोग्य एका उत्कृष्ट लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिकासाठी आवश्यक ठरते.
- लेफ्टनंट जनरल रणबीरसिंग सलारिया,
कमांडंट, स्कूल आॅफ आर्टिलरी