प्राप्तीकर भरणाऱ्या शेतकऱ्यांकडून ३ कोटी ५३ लाख ८४ हजारांची वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:11 AM2020-12-09T04:11:11+5:302020-12-09T04:11:11+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क नाशिक : पंतप्रधान किसान सन्मान योजनेत चुकीची माहिती भरून सरकारी अनुदान लाटल्याप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील सुमारे ११ ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : पंतप्रधान किसान सन्मान योजनेत चुकीची माहिती भरून सरकारी अनुदान लाटल्याप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील सुमारे ११ हजाार शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाने नोटिसा धाडून वसुलीचे आदेश दिले होते. शासनाकडून पदरात पाडून घेतलेले अनुदान परत करण्यासाठी तालुका पातळीवर मोहीमदेखील सुरू करण्यात आली.
करदाते आणि शासकीय नोकरीत असलेले तसेच लोकप्रतिनिधी असलेले शेतकरी वगळून पंतप्रधान किसान सन्मान योजना केंद्राने जाहीर केली होती. यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये तीन टप्प्यांत देण्याची ही योजना जिल्ह्यात लागू करण्यात आली होती. मात्र पात्र शेतकऱ्यांबरोबरच अपात्र शेतकऱ्यांनीदेखील अनुदानासाठी अर्ज केल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर अशा शेतकऱ्यांकडून वसुली केली जात आहे. जिल्ह्यातील सुमारे ११ हजार शेतकऱ्यांना यासाठी नोटिसा पाठविण्यात आल्या.
--इन्फो--
सधन तालुके
योजनेचा लाभ घेणारे शेतकरी हे सधन तालुक्यांमधील आहेत. त्यामध्ये चांदवड, नांदगाव तसेच अन्य काही तालुक्यांमधील शेतकऱ्यांचा समावेश आहे. काही तालुके हे भौगोलिकदृष्टा दुष्काळी दिसत असले तरी सधन शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. अशा शेतकऱ्यांनी केंद्राचे अनुदान लाटले. काही तालुक्यात शासकीय यंत्रणेनेच नावे घुसविल्याची चर्चादेखील आहे.
--इन्फो--
बोजा टाकणार
सरकारी योजनेचे अनुदान लाटल्याप्रकरणी नोटिसा पाठवूनही संबंधित शेतकऱ्यांनी रक्कम परत केली नाही, तर त्यांच्यावर कर्जाचा बोजा चढविला जाण्याची शक्यता आहे. त्याप्रमाणेच वसुलीसाठी तालुका पातळीवर नियोजन करण्यात आले आहे. रक्कम परत न करणाऱ्या शेतकऱ्यांवर कायदेशीर कारवाईदेखील केली जाणार आहे.