शिक्षण मंडळाकडे ३ कोटी ८२ लाखांचा ‘गल्ला’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:16 AM2021-09-11T04:16:43+5:302021-09-11T04:16:43+5:30

नाशिक : कोरोना संकटामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दहावीची ऑफलाइन परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यांकन पद्धतीने निकाल जाहीर केले. ...

3 crore 82 lakhs to the Board of Education | शिक्षण मंडळाकडे ३ कोटी ८२ लाखांचा ‘गल्ला’

शिक्षण मंडळाकडे ३ कोटी ८२ लाखांचा ‘गल्ला’

Next

नाशिक : कोरोना संकटामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दहावीची ऑफलाइन परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यांकन पद्धतीने निकाल जाहीर केले. त्यानंतर अकरावीची प्रवेश प्रक्रियाही सुरू झाली आहे. परंतु, अद्याप शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांकडून घेतलेले परीक्षा शुल्क परत केलेले नाही. त्यामुळे शिक्षण मंडळ परीक्षा शुल्क कधी परत करणार, असा सवाल विद्यार्थी व पालकांकडून उपस्थित केला जातो आहे.

कोरोना काळात विद्यार्थ्यांना संसर्गाचा धोका उद्धभवू नये, यासाठी शासनाच्या सूचनेनुसार राज्य शिक्षण मंडळाने अंतर्गत मूल्यमापनाच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करून निकाल जाहीर केले. त्यामुळे यंदा लेखी परीक्षा झाली नाही. पर्यायाने पर्यवेक्षकांना मानधन, विद्यार्थ्यांना देण्यात येणारे अतिरिक्त साहित्य, भरारी पथकांचा खर्च, प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांचा मुद्रणखर्च असा खर्च माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला आला नाही. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांकडून जमा केलेले परीक्षा शुल्क शिक्षण मंडळ कधी परत करणार, असा प्रश्न पालक संघटनांकडून उपस्थित केला जात आहे. दहावीच्या परीक्षाच रद्द झाल्याने त्यासाठी खर्चही होणार नसल्याने, आता दहावीच्या विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेले परीक्षा शुल्कही शिक्षण मंडळ विद्यार्थ्यांना परत करावे, अशी मागणी नाशिकमधील पालकांकडून जोर धरू लागली आहे. नाशिक विभागीय शिक्षण मंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ९२ हजार २३६ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसणार होते. या विद्यार्थ्याकडून राज्य शिक्षण मंडळाने ४१५ रुपये परीक्षा शुल्क घेतले असून, पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्याला ३९५ रुपये परीक्षा शुल्क भरावे लागले होते. याप्रमाणे, मंडळाकडे जवळपास ३ कोटी ८२ लाख ७७ हजार ९४० रुपये शुल्क यंदा जमा झाल्याचा अंदाज असून ही रक्कम मंडळाने विद्यार्थ्यांना परत करण्याची मागणी होत आहे.

---

दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करण्याबाबत शासनाकडून कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व शासनस्तरावर निर्णय झाल्यानंतर तसे निर्देश विभागीय मंडळाला प्राप्त होतील. त्यानुसार, विभागीय मंडळ अंमलबजावणी करेल. याबाबत विभागीय मंडळाकडे अधिकार नाही.

- के. बी. पाटील, अध्यक्ष, विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नाशिक

---

जिल्ह्यातील एकूण माध्यमिक शाळा- १,०९० प्रति विद्यार्थी परीक्षा शुल्क - ४१५

दहावीतील एकूण विद्यार्थी - ९२,२३६ परीक्षा शुल्काची एकूण रक्कम -३,८२,७७,९४०

Web Title: 3 crore 82 lakhs to the Board of Education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.