तरुणाला ३ लाख २३ हजारांचा गंडा
By admin | Published: June 19, 2017 01:13 AM2017-06-19T01:13:22+5:302017-06-19T01:13:41+5:30
तरुणाला ३ लाख २३ हजारांचा गंडा
लोकमत न्यूज नेटवर्क
इगतपुरी : शहरातील स्टेट बँकेच्या एटीएम मशीनमधून पैसे काढून देतो असे सांगून एटीएम कार्ड चोरून नेत एका तरुणाला ३ लाख २३ हजारांचा गंडा घालण्यात आला असून, पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इम्तियाज बाबूमिया पटेल (३६), रा. पिंप्रीसदो, तालुका इगतपुरी यांचे घोटी येथील स्टेट बँकेत बचत खाते आहे. शुक्र वारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ते इगतपुरी शहरातील स्टेट बँकेच्या जुना मुंबई-आग्रा मार्गावरील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी त्यांच्या लहान मुलासमवेत गेले असता एक अज्ञात २२ ते २५ वर्षे वयातील तरुण इतर नागरिकांचे एटीएम यंत्रातून पैसे काढून देत होता. फिर्यादी इम्तियाज पटेल यांनीदेखील त्याच्याकडे एटीएम कार्ड देत पाच हजार रु पये काढून घेतले. दरम्यान, अज्ञात चोरट्याने हातचलाखी करून त्याच्याकडे असलेले बोगस एटीएम कार्ड पटेल यांच्याकडे दिले व पटेल यांचे कार्ड स्वत:कडे ठेवले. त्यानंतर चोरट्याने पटेल यांच्या एटीएम कार्डद्वारे एटीएममधून प्रथम ३५ हजार रुपये काढून पोबारा केला. त्यानंतर बँकेच्या विविध आठ शाखांतून दुपारी ३.३७ वाजेपर्यंत स्वॅप मशीनद्वारे एकूण तीन लाख २३ हजार रु पये काढून घेतले. सायंकाळी मोबाईलवरील मेसेज पाहिल्यानंतर पटेल यांच्या ही बाब लक्षात आली.