54 हजारांना 2 रेमडेसीवीर विकणाऱ्या 3 नर्स अन् मेडीकलवाल्यास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 12:41 PM2021-05-14T12:41:04+5:302021-05-14T12:42:06+5:30
नाशकात रेमेडिसीवीरचा काळाबाजार करणाऱ्या चौघांना अटक
नाशिक - कोरोना महामारीचा सामना करताना अनेकजण विधायक कार्यातून समाजापुढे आदर्श निर्माण करत आहेत. आपल्या ताटातील अर्धा घास गोरगरिबांसाठी देण्याचा प्रयत्न करत आहेत. अगदी भाजीवाल्या आजीपासून ते उद्योजकांपर्यंत सर्वचजण या संकटात योगदान देत आहे. मात्र, काही समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेत रुग्णांना आवश्यक असलेले इंजेक्शन व इतर मेडिसीन चढ्या दराने विकत आहेत. नाशिकमध्ये पुन्हा एकदा हा प्रकार उघडकीस आला आहे.
कोरोना रुग्णांना लागणारे रेमडेसीवीर इंजेक्शन जादा दराने विक्री करणाऱ्या चौघांना आडगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आडगाव शिवारात क. का. वाघ कॉलेज परिसरात बनावट ग्राहक पाठवून आडगाव पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई केली आहे, त्यांच्याकडून 54 हजार रुपये किंमतीचे 2 रेमडेसीविर इंजेक्शन जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांमध्ये 3 महिला नर्स तर एक मेडिकल दुकानात काम करणाऱ्या युवकाचा समावेश आहे. दरम्यान, नाशिक शहरात यापूर्वीही रेमेडेसीवीरचा काळाबाजार करताना अनेकांना अटक करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात अशाच प्रकारे एक सामाजिक कार्यकर्त्याने सापळा रचून दोन जणांना पकडून दिले होते. त्यापाठोपाठ ही दुसरी घटना घडली आहे.