बारा तासांत नाशकात ३८ रुग्ण : कोरोनाबाधितांचा आकडा ५५९ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 02:13 PM2020-05-08T14:13:01+5:302020-05-08T14:16:06+5:30
एकूणच जिल्ह्यातील मालेगावमध्ये कोरोनाचा कहर सुरू असून नाशिक शहरातही विविध उपनगरांमध्ये आता कोरोनाचा प्रादूर्भाव वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाउनचे सर्व नियमांचे पालन करणे अत्यावश्यक
नाशिक : शहरासह जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून गुरूवारी (दि.७) जिल्ह्यात रात्री साडेनऊ वाजेपर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा ५२१ इतका होता; मात्र शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता हा आकडा थेट ५५९ पर्यंत जाऊन पोहचला. यामध्ये शहरासह मालेगाव आणि दिंडोरी तालुक्यातदेखील कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आता नाशिककरांची चिंता कमालीची वाढली आहे. शुक्रवारी सकाळपर्यंत प्रलंबित ६०० नमुन्यांपैकी ४२० अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये ३८० निगेटिव्ह तर एकूण ३८ पॉझिटिव्ह रुग्ण नव्याने आढळून आले.
मालेगावमध्ये कालपर्यंत ४२० रुग्ण होते; मात्र सकाळी ही संख्या ४४१ वर पोहचली म्हणजेच २१ नवे रुग्ण मालेगावमध्ये आढळून आले. यामध्ये दीड वर्षाच्या चिमुकल्याचाही समावेश आहे. तसेच नाशिक शहराचा कोरोनाबाधितांचा आकडा आता ३९ वर पोहचला आहे. शुक्रवारी सकाळी नाशिक महापालिका क्षेत्रात १३ नवे रुग्ण आढळले. यामध्ये सातपूरला अवघ्या दोन वर्षाच्या बालिकेचाही समावेश आहे.
एकूणच जिल्ह्यातील मालेगावमध्ये कोरोनाचा कहर सुरू असून नाशिक शहरातही विविध उपनगरांमध्ये आता कोरोनाचा प्रादूर्भाव वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाउनचे सर्व नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असून गरजेपुरतेच बाहेर पडावे, तेदेखील योग्य ती काळजी घेऊनच असे आवाहन जिल्हा व आरोग्य प्रशासनाबरोबरच पोलीस प्रशासनाकडूनही केले जात आहे; मात्र नागरिकांमध्ये त्याचे कुठलेही गांभीर्य दिसून येत नसल्याने मोठे आश्चर्य व्यक्त होत आहे.
नाशिक जिल्हा प्रशासनाने बुधवारपासून शहरातील जवळपास सर्वच दुकाने खुली करण्याची मुभा दिली आहे. अर्थचक्र गतिमान करण्यासाठी प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला असला तरीदेखील त्याचा गैरफायदाच अधिक घेतला जात असल्याचे दिवसभराच्या चित्रावरून दिसून आले. तसेच आता दुकाने खुली ठेवण्याची वेळ देखील सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत करण्यात आली आहे. गुरूवारी शहरातील बाजारपेठांमधील काही भागात नागरिकांनी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेच्या दरम्यान चांगलीच गर्दी केली होती असेच चित्र शुक्रवारीसुध्दा पहावयास मिळाले. शुक्रवारी वाइन शॉपदेखील खुले केले गेले. यामुळे वाइन खरेदीसाठीही मद्यपी घराबाहेर पडले; मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने आखलेल्या नियोजनामुळे शहरात काही अपवाद वगळता फारसा गोंधळ सोमवारप्रमाणे वाइनशॉपच्या बाहेर पहावयास मिळाला नाही.
महिन्याचा पहिला आठवडा पूर्ण होत असल्याने किराणा दुकानांवरदेखील आता महिन्याचा किराणा भरण्यासाठी रांगा नजरेस पडू लागल्या आहेत. शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार शहरात महापालिका क्षेत्रात सातपूर कॉलनीमध्ये आठ तर पाथर्डीफाटा, पाटीलनगर, नवीन सिडको, श्रीकृष्णनगर, पंचवटीतील हिरावाडी या भागात प्रत्येकी एक असे एकूण १३ नवीन कोरोनाबाधित रुग्णांचा नमुना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला.
तसेच ग्रामिण भागातदेखील कोरोनाचा प्रादूर्भाव आता वाढताना दिसत आहे. जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात अद्याप कोरोनाने शिरकाव केलेला नव्हता; मात्र आज सकाळी दिंडोरीतदेखील एक रूग्ण आढळून आला आहे. तसेच विंचूर गावात दोन कोरोनाबाधित आढळले.
कोरोना अपडेट्स
पॉझिटिव्ह रूग्णसंख्या अशी...
नाशिक ग्रामिण - ६०
नाशिक मनपा - ३९
मालेगाव मनपा - ४४१
जिल्हा बाहेरील - १९
पुर्णपणे बरे झालेले रुग्ण ४६
कोरोणाग्रस्त एकूण १९ रुग्णांचा बळी (मालेगावमधील १८)
रूग्णालयात उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रूग्ण एकूण ४९४
अद्याप १८० कोरोना नमुना चाचणी अहवालांची प्रतीक्षा कायम