संततधार पावसामुळे गंगापूर धरणात ७५ टक्के साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 01:01 AM2019-07-29T01:01:30+5:302019-07-29T01:01:50+5:30
:संततधार पावसामुळे गंगापूर धरणात ७५ टक्के साठाभावली शंभर टक्के आणि दारणा ८७ टक्के भरले आहे. दरवर्षी वेळेत येऊन धरणे भरवणाऱ्या पावसाने यंदा ओढ दिल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस नव्हता. मात्र जुलै महिन्याच्या मध्यापासून पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे साठा वाढू लागला आहे. जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ या तालुक्यांचा अपवाद वगळता अन्य तालुक्यांमध्ये समाधानकारक पर्जन्यमान अद्यापही झाले नाही.
नाशिक :संततधार पावसामुळे गंगापूर धरणात ७५ टक्के साठाभावली शंभर टक्के आणि दारणा ८७ टक्के भरले आहे.
दरवर्षी वेळेत येऊन धरणे भरवणाऱ्या पावसाने यंदा ओढ दिल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस नव्हता. मात्र जुलै महिन्याच्या मध्यापासून पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे साठा वाढू लागला आहे. जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ या तालुक्यांचा अपवाद वगळता अन्य तालुक्यांमध्ये समाधानकारक पर्जन्यमान अद्यापही झाले नाही. अन्यत्र मात्र पावसाची रिपरिप सुरूच आहे. इगतपुरीत गेल्या चोवीस तासांत १२६ तर त्र्यंबकेश्वरमध्ये १७२ मिमीपर्यंत पावसाची नोंद झाली. त्यामुळे गंगापूर, दारणा आणि भावली या धरणांचा जलसाठा वाढत आहे. दारणामधून आज सकाळी सहा वाजता १६ हजार ५९८ तर भावलीमधून १ हजार २१८ क्यूसेक इतका विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला. तसेच निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर बंधाºयातूनदेखील पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासांत एकूण ४४१ मिमी इतका पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस त्र्यंबकेश्वरमध्ये १७२ तर अंबोलीत ९२ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे ४७७ दलघफूपर्यंत नव्याने पाण्याची आवक गंगापूर धरणात होऊन धरण ७४.३५ टक्के भरले. या समूहातील कश्यपी ४८ तर गौतमी गोदावरी ५८ टक्के भरले आहे. त्यामुळे रविवारी सायंकाळपर्यंत गंगापूर पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणसाठा ८० टक्क्यांपर्यंत पोहचू शकतो. त्यानंतर पावसाचा अंदाज घेऊन जलसंपदा विभागाकडून गंगापूर धरणातून विसर्ग करण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच
शुक्र वारपासून नाशिक शहरातदेखील मध्यम सरींची संततधार सुरू असल्याने गोदावरीच्या पातळीत वाढ झाली आहे. पहाटेपासून सकाळी ११ वाजेपर्यंत शहरात संततधार सुरू होती. गेल्या चोवीस तासांत शहरात १७ मिमीपर्यंत पाऊस नोंदविला गेला.
पाणीकपात रद्दबाबत आज निर्णय शक्य
गंगापूर धरणात पुरेसा साठा नसल्याने गेल्या ३० जूनपासून शहरात पाणीकपात लागू करण्यात आली आहे. त्यानुसार शहरात ज्या भागात दोन वेळ पाणीपुरवठा होतो त्याठिकाणी एकवेळ पाणीपुरवठा करण्यात आला असून, संपूर्ण शहरात दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. महापौर रंजना भानसी यांनी गंगापूर धरणासाठी साठा ८० टक्के झाल्यानंतर पाणीकपात रद्द करू, असे जाहीर केले होते. आता जवळपास ८० टक्के साठा होईल, अशी स्थिती आहे. सोमवारी (दि.२९) याबाबत आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे आढावा बैठक होणार असून, त्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.