नांदगाव वाखारी हत्याकांडातील 3 संशयितांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 09:34 PM2021-04-06T21:34:29+5:302021-04-07T01:05:26+5:30
नांदगांव : नांदगाव-मालेगाव तालुक्यांच्या सीमेवरील वाखारी गावात एकाच कुटुंबातील चार जणांचा निर्घृण खून केल्याच्या घटनेतील 3 संशयित आरोपींना पोलिसांनी आठ महिन्यांनंतर अटक केली आहे. या संशयितांकडून अन्य गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
नांदगांव : नांदगाव-मालेगाव तालुक्यांच्या सीमेवरील वाखारी गावात एकाच कुटुंबातील चार जणांचा निर्घृण खून केल्याच्या घटनेतील 3 संशयित आरोपींना पोलिसांनी आठ महिन्यांनंतर अटक केली आहे. या संशयितांकडून अन्य गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
नांदगाव परिसरातील वाखारी व मालेगाव तालुक्यातील जेऊर रस्त्यालगत वाखारी शिवारातील आण्णा पुंजाराम चव्हाण यांच्या शेतातील घराच्या ओट्यावर त्यांचा मुलगा समाधान चव्हाण (३५), सून भारती (२६), नात आराध्या (७), तसेच नातू अनिरुद्ध चव्हाण (५) हे झोपलेले असताना, त्यांचा धारदार हत्याराने खून करण्यात आला होता. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. ठिकठिकाणी मोर्चे काढून व आंदोलने करून नागरिकांनी संशियतांच्या अटकेची मागणी पोलिसांकडे केली होती. या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर घटनेबाबत ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध घेणेसाठी स्थानिक गुन्हे शाखेची विविध पथके गेल्या सात महिन्यांपासून ठिकठिकाणी संशयितांचा शोध घेत होते.
पोलिसांनी अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव परिसरात पथके रवाना केली होती. तपासात सचिन उर्फ बॉग्या उर्फ पवन उर्फ रवि उर्फ धर्मा सखाहरी चव्हाण (रा.पढेगाव, ता.कोपरगाव, जि.अहमदनगर), सचिन विरुपण भोसले (रा.शिरोडी, ता.वाळुंज, जि.औरंगाबाद), संकेत उर्फ संदीप महेंद्र चव्हाण (रा.भूषणनगर, दत्त चौक, केडगाव, जि.अहमदनगर ह.मु. पढेगाव, ता.कोपरगाव) यांच्यावर संशय बळावला. सचिन उर्फ बॉग्या सखाहरी चव्हाण हा या गुन्ह्याच्या कालावधीत वाखारी परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याचा साथीदार संकेत महेंद्र चव्हाण हा दहावा मैल परिसरात नाशिक मार्गे कोपरगावला जाण्यासाठी येणार आहे, अशी गुप्त माहिती स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांना मिळाली. त्याप्रमाणे, पोलीस पथकाने सापळा रचून संकेत यास ताब्यात घेऊन त्याला पोलिसी खाक्या दाखवताच, धक्कादायक माहिती उघड झाली. त्यानुसार, घटनेतील संशियतांना अटक करण्यात आली आहे. या घटनेतील संशयित सराईत असून त्यांचेविरुद्ध जिल्ह्यातील नांदगाव, येवला, औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर, गंगापुर आणि अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव, नगर तालुका पोलीस ठाण्यांमध्ये दरोडा, जबरीचोरी, घरफोडी व चोरी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा राजेंद्र कुटे यांच्या पथकातील पोउनि संजयकुमार सोने, सपोउनि रवींद्र शिलावट, पोहवा रवींद्र वानखेडे, नंदू काळे, संजय गोसावी, विश्वनाथ काकड, सागर काकड, प्रवीण सानप, संतोष जगताप, हरिश आव्हाड, पलकों कुणाल मोरे, गिरीश बागुल, हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम, गौरव पगारे यांनी या गुन्ह्यांची उकल केली.