एकाच दिवशी ३२ संशयित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 10:01 PM2020-04-17T22:01:11+5:302020-04-18T00:26:13+5:30
नाशिक : शहरात पाच कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेची वैद्यकीय विभागाची चक्रे वेगाने फिरली आहेत.
नाशिक : शहरात पाच कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेची वैद्यकीय विभागाची चक्रे वेगाने फिरली आहेत. त्यात विविध भागांतील ३२ संशयित रुग्ण शुक्रवारी (दि.१७) महापालिकेच्या रुग्णालयासह खासगी रुग्णालयात आढळले आहे, तर याच परिसरातील ४४ नागरिकांना सर्दी, खोकला, ताप असा त्रास होत असल्याने त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी डॉ. जाकीर हुसेन रुग्णालयाकडे संदर्भित करण्यात आले आहे. नाशिक शहरात सुरुवातीला एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नव्हता. मात्र, नंतर विविध भागांत पाच रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आधीच सतर्क असलेल्या महापालिका प्रशासनाने पुढील कार्यवाही युद्धपातळीवर सुरू केली आहे. बाधित रुग्णांच्या परिसरातील पाचशे मीटर ते तीन किलोमीटर अंतराचे क्षेत्र सिल केल्यानंतर या भागातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी शहरात ७५ वैद्यकीय पथके नियुक्त करण्यात आली आली आहेत. शुुक्रवारी (दि.१७) वैद्यकीय पथकांनी ४ हजार ६६१ घरांना भेटी दिल्या आणि १७ हजार ४१४ नागरिकांची आरोग्य तपासणी केली. यात अलीकडे आढळलेल्या बाधित रुग्णांच्या घराच्या परिसरात कोरोनाप्रमाणेच आजाराची लक्षणे असलेले ४४ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे या सर्वांना अधिक तपासणीसाठी महापालिकेच्या रुग्णालयात पाठविण्यात आले आहे, तर अन्य ३२ जणांमध्ये सर्दी-खोकल्याची लक्षणे आढळल्याने त्यांना माहापालिका आणि अन्य खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. यात ३0 जणांना मनपाच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात, तर दोन जणांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.