सिन्नर तालुक्यात कोरोनाचे ३ हजार ८५२ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:15 AM2020-12-31T04:15:14+5:302020-12-31T04:15:14+5:30
सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागातील पाथरे येथे २४ मार्च, २०२० रोजी तालुक्यातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर, ...
सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागातील पाथरे येथे २४ मार्च, २०२० रोजी तालुक्यातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर, नऊ महिन्यांत तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३ हजार ८५२ झाली. आतापर्यंत तालुक्यातील ८७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळातही समृद्धी व सिन्नर-शिर्डी महामार्गाचे काम सुरू राहिल्याने सदर प्रकल्पाची वाटचाल प्रगतीच्या दिशेने आहे.
मालेगाव येथून आलेल्या पाथरे येथील ग्रामस्थाला कोरोनाची बाधा झाल्याचे समजल्यानंतर, तालुका २४ मार्च रोजी हादरून गेला होता. त्यानंतर, पाथरे व परिसरातील सात गावांमध्ये १४ दिवसांचा कडक लॉकडाऊन पाळण्यात आला. त्यानंतर, तालुकाभर सर्वदूर कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर, तालुक्यात सुमारे तीन महिने कडक लॉकडाऊन पाळण्यात आला होता. कोरोनाचा नायलाट करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळण्यात आले. सिन्नर शहरासह गावोगावी प्रतिबंधात्मक औषधांची फवारणी करण्यात आली. पायी जाणारे मजूर व प्रवाशांना थांबवून वावी, सिन्नर व नांदूरशिंगोटे येथे निवारागृह उभारण्यात आले होते. त्यात या वाटसरू व प्रवाशांना क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यानंतर, काही दिवसांनी प्रशासनाने त्यांना रेल्वे व बसने त्यांच्या गावी सोडण्याची व्यवस्था केली होती. कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर सिन्नर ग्रामीण रुग्णालय व मुसळगाव शिवारात इंडिया बुल्स येथे कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली होती. या दोन्ही रुग्णालयांत रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने जागाही अपूर्ण पडू लागली होती.
३० डिसेंबरपर्यंत तालुक्यात ३ हजार ८५२ कोरोनाबाधित रुग्ण सापडले. त्यातील ३ हजार ६०१ रुग्णांना उपचार करून घरी सोडून देण्यात आले आहे. यात ८७ रुग्णांचा मृत्यू झाला, तर आजमितीस तालुक्यात १६४ अॅक्टिव्ह रुग्णांवर सिन्नर ग्रामीण रुग्णालयात व घरी उपचार सुरू आहेत.
-------------------
कोरोना या महामाारीचा सिन्नर तालुक्यात संसर्ग सुरू झाल्यानंतर, सर्वच व्यवसाय व विकासकामे ठप्प झाली होती. तथापि, मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गाचे काम सुरू होते. हे काम बंद करण्यासाठी मजुरांसह स्थानिक ग्रामस्थांनीही प्रशासनावर प्रचंड दडपण आणले होते. मात्र, प्रशासनाने खबरदारी घेत काम सुरूच ठेवले होते. त्यामुळे वर्षअखेरपर्यंत सदर काम प्रगतिपथावर आहे. सिन्नर-शिर्डी या चौपदरीकरणाच्या कामासही लॉकडाऊनच्या काळात प्रारंभ झाला. या महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामानेही वेग घेतला आहे. कोरोनाच्या काळात सदर दोन्ही विकासकामे सुरू ठेवल्याने ती वर्षअखेरीस चांगल्या प्रगतिपथावर आल्याचे दिसून येते.