तीन हजार गर्भवती महिलांना मिळाला लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 12:56 AM2019-02-18T00:56:17+5:302019-02-18T00:57:06+5:30
सिन्नर : माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी असलेली प्रधानमंत्री मातृवंदना योजना गरोदर महिला व स्तनदा माता यांच्यासाठी वरदान ठरत आहे. सदरची योजना सुरू झाल्यापासून सिन्नर तालुक्यातील २ हजार ९३५ महिला लाभार्थ्यांना १ कोटी ६० लाख ९ रुपयांचे अनुदान थेट खात्यात वर्ग करण्यात आले आहे.
सिन्नर : माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी असलेली प्रधानमंत्री मातृवंदना योजना गरोदर महिला व स्तनदा माता यांच्यासाठी वरदान ठरत आहे. सदरची योजना सुरू झाल्यापासून सिन्नर तालुक्यातील २ हजार ९३५ महिला लाभार्थ्यांना १ कोटी ६० लाख ९ रुपयांचे अनुदान थेट खात्यात वर्ग करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री मातृवंदना योजनला सिन्नर तालुक्यात सकारात्मक प्रतिसाद लाभला आहे. तालुक्यातील ६० टक्क्यांच्या आसपास गर्भवती महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. ही योजना ग्रामीण व शहरी भागात लागू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या योजनेच्या लाभासाठी अनुसूचित जाती, जमाती, बीपीएल अशा प्रकारच्या कोणत्याही अटी-शर्ती ठेवण्यात आल्या नव्हत्या. ग्रामीण भागातील गर्भवती महिला व स्तनदा मातांना पौष्टिक आहार घेण्यासाठी प्रोत्साहित करून त्यांच्यासह नवजात बालकांच्या आरोग्यात सुधारणा तसेच बालमृत्यू व मातामृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी जानेवारी २०१७ पासून प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू करण्यात आली आहे. त्यांना पौष्टिक आहार मिळावा या उद्देशाने तीन टप्प्यांत हा लाभ देण्यात येत असतो.
या योजनेंतर्गत पाच हजारांचे अनुदान थेट संबंधित महिला लाभार्थींच्या बँक खात्यात वर्ग
केले जाते. पहिल्या अपत्यासाठीच सदरची योजना लागू केली
आहे. पाच हजारांचे अनुदान तीन टप्प्यांत महिला लाभार्थीला मिळते. पहिला हप्ता एक हजार तर नंतरचे दोन हप्ते प्रत्येकी दोन हजारांचे असतात.
पहिल्या हप्त्यासाठी संबंधित महिला लाभार्थीला मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून १५० दिवसांच्या आत गर्भधारणा नोंदणी करणे आवश्यक आहे. दुसरा हप्ता गर्भधारणेच्या सहा महिन्यांनंतर प्रसूतीपूर्व तपासणी केल्यास संबंधित महिलेला मिळतो, तर तिसरा हप्ता प्रसूतीनंतर नवजात शिशू तीन लसीकरण दिल्यानंतर बॅँक खात्यात जमा होतात.सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून कामकाजगेल्या दोन वर्षांच्या कालावधीत तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून प्रधानमंत्री मातृवंदना योजना राबविण्यात आली आहे. यामध्ये दापूर (४८५), देवपूर (५४५), नायगाव (६३७), पांढुर्ली (५१३), ठाणगाव (२७८), वावी (४७७) आदी प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिलांना प्रधानमंत्री मातृत्व योजनेचा लाभ मिळाला आहे.जिल्हा परिषद व आरोग्य विभाग यांच्यामार्फत योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली आहे. योजनेचा लाभ मिळविण्याच्या दृष्टीने कार्यक्षेत्रातील आशा, अंगणवाडीसेविका, आरोग्यसेविका यांच्याशी संपर्क साधावा.
- शीतल सांगळे, अध्यक्ष, जिल्हा परिषद, नाशिकप्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत सिन्नर तालुक्यात १ जानेवारी २०१७ ते ३१ जानेवारी २०१९ या कालावधीत एकूण २ हजार ९३५ लाभार्थ्यांना १ कोटी ६० लाख ९ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. गेल्या आठ दिवसांत तालुक्यातील सहा ६००च्या आसपास महिलांनी अर्ज दाखल केले आहे. - मोहन बच्छाव,
तालुका वैद्यकीय अधिकारी, सिन्नर