कुलगुरुपदासाठी जगन्नाथ दीक्षित, मोहन खामगावकर यांच्यासह ३० अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 01:28 AM2021-03-17T01:28:47+5:302021-03-17T01:30:30+5:30
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांचा कार्यकाळ फेब्रुवारी २०२१ मध्ये संपुष्टात आल्यानंतर त्यांना कार्यमुक्त करण्यात आले असून, विद्यापीठाच्या नूतन कुलगुरू निवडीसाठी प्रक्रिया सध्या सुरू आहे. या प्रक्रियेअंतर्गत कुलगुरुपदासाठी देशभरातील विविध नामांकित वैद्यकीय संस्थांमध्ये कार्यरत तब्बल ३० इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांचा कार्यकाळ फेब्रुवारी २०२१ मध्ये संपुष्टात आल्यानंतर त्यांना कार्यमुक्त करण्यात आले असून, विद्यापीठाच्या नूतन कुलगुरू निवडीसाठी प्रक्रिया सध्या सुरू आहे. या प्रक्रियेअंतर्गत कुलगुरुपदासाठी देशभरातील विविध नामांकित वैद्यकीय संस्थांमध्ये कार्यरत तब्बल ३० इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले असून, यात विद्यापीठाचे विद्यमान प्र-कुलगुरू डॉ. मोहन खामगावकर व मधुमेहमुक्त भारत अभियानाचे प्रणेते तथा औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचाही समावेश आहे.
यात प्रामुख्याने पुण्यातील सुमतीबाई शाह आयुर्वेद महाविद्यालयातील डॉ. सचिनकुमार पाटील, नवीन पारगाव येथील तात्यासाहेब कोरे दंतवैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य हरीश कुलकर्णी, जयसिंगपूर येथील जेजेएमएएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद बुद्रुक, अमरावतीच्या डॉ. पी. डी. एम. वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रा. पुष्पा जुंगारे, मुंबईतील सेठ जीएस वैद्यकीय महाविद्यालय तथा केईएम रुग्णालयाचे प्रा. हरीश पाठक, राष्ट्रीय जनआरोग्य व संशोधन संस्थेचे संचालक डॉ. दीपक राऊत, सैन्य रुग्णालयाचे वैद्यकीय सेवा महासंचालक लेफ्टनंट जनरल अशोक हुडा यांच्यासह विद्यापीठाचे विद्यमान प्र-कुलगुरू डॉ. मोहन खामगावकर व मधुमेहमुक्त भारत अभियानाचे प्रणेते तथा औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक जगन्नाथ दीक्षित, आदी ३० इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाल्याची माहिती वैद्यकीय विज्ञान संस्थेचे कक्ष अधिकारी संजीव ललवाणी यांनी दिली आहे.
निवड समितीने मागविले अर्ज
माजी कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली ९ नोव्हेंबर २०२० झालेल्या विद्यापीठ अधिकार मंडळाच्या व्यवस्थापन परिषद व विद्या परिषदेच्या संयुक्त बैठकीत नूतन कुलगुरू निवडीसंदर्भात चर्चा झाल्यानंतर निवड समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या माध्यमातून नवी दिल्ली येथील अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संंस्थेतर्फे २२ जानेवारी २०२१ रोजी संकेतस्थळ व प्रसिद्धीमाध्यमांत जाहिरातीद्वारे कुलगुरुपदासाठी २४ फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागवले होते. त्यानंतर ही मुदत ८ मार्चपर्यंत वाढविण्यात आली होती. या कालावधीत देशभरातून कुलगुरुपदासाठी अर्ज वैद्यकीय क्षेत्रातील ३० इच्छुक तज्ज्ञांनी अर्ज केले आहे.