तीस कोटींच्या पीककर्जाचे वाटप?
By admin | Published: May 25, 2017 02:02 AM2017-05-25T02:02:58+5:302017-05-25T02:03:11+5:30
नाशिक : जिल्हा बॅँकेकडे कर्जफेड करणाऱ्या सभासदांना सुमारे ३० कोटींचे पीक कर्जवाटप केल्याचा दावा जिल्हा बॅँकेच्या सूत्रांनी केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या वतीने खरीप पीक कर्ज वाटपाचा विषय वादात असतानाच जिल्हा बॅँकेकडे कर्जफेड करणाऱ्या सभासदांना सुमारे ३० कोटींचे पीक कर्जवाटप केल्याचा दावा जिल्हा बॅँकेच्या सूत्रांनी केला आहे. तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या रिक्त असलेल्या कार्यकारी संचालक पदावर राज्य शिखर बॅँकेचे व्यवस्थापक राजेंद्र बकाल यांची नियुक्ती अधांतरी सापडल्याचे वृत्त आहे. राजेंद्र बकाल यांना नियुक्त करण्यासाठी जिल्हा बॅँकेचा मासिक बैठकीचा ठराव लागणार असून, अद्याप जिल्हा बॅँकेची मासिक बैठकीची तारीखच जिल्हा बॅँक अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी निश्चित न केल्याने जिल्हा बॅँकेच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्तीबाबत राजेंद्र बकाल यांचे भवितव्य अधांतरी राहिल्याचे चित्र आहे. मागील आठवड्यात मुंबईला सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासह पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक जिल्हा बॅँकेच्या संचालकांची एक तातडीची बैठक झाली होती. या बैठकीत जिल्हा बॅँकेच्या पीक कर्ज वसुलीसाठी राज्य शिखर बॅँकेकडून राजेंद्र बकाल यांच्या रूपाने जिल्हा बॅँकेला कार्यकारी संचालकपदी नियुक्ती देण्याचे आश्वासन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले होते. त्यासाठी जिल्हा बॅँकेचा ठराव मागितला होता. प्रत्यक्षात जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळाची मासिक बैठक नसल्याने हा ठराव तातडीने सहकार विभागाला जिल्हा बॅँकेला पाठविता आलेला नाही. ज्या शेतकरी सभासदांनी १५७ कोटींच्या पीक कर्जाची परतफेड केली आहे त्यातील काही सभासद शेतकऱ्यांना खरिपासाठी जिल्हा बॅँकेकडून सुमारे ३० कोटींचे पीक कर्ज वाटप केल्याचा दावा बॅँकेच्या संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आला आहे.