नाशिक शहरात आढळले ३० नवे पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 01:22 AM2020-06-05T01:22:16+5:302020-06-05T01:24:29+5:30
जिल्ह्यातील कोरोनाचा कहर सुरूच असून, गुरुवारी एकूण ४५ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, नाशिक शहरातील एका कोरोना-बाधिताचा मृत्यू झाला असून, त्यामुळे शहरातील बळींची संख्या १३ झाली आहे.
नाशिक : जिल्ह्यातील कोरोनाचा कहर सुरूच असून, गुरुवारी एकूण ४५ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, नाशिक शहरातील एका कोरोना-बाधिताचा मृत्यू झाला असून, त्यामुळे शहरातील बळींची संख्या १३ झाली आहे.
नाशिक जिल्ह्यातील गुरुवारी मिळालेल्या ६८ अहवालांपैकी ५४ निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या १४ अहवालांमध्ये सर्वच नवीन रुग्ण आहेत. त्यात मालेगाव येथील ९, निफाड आणि येवला येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. याशिवाय जामनेर, जळगाव येथील प्रत्येकी १ व मुंबईच्या दोघांचाही त्यामध्ये समावेश आहे. रात्री नाशिक शहरातील आणखी ३० रुग्ण बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
जुन्या नाशकातील एका बाधित रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाल्याने शहरातील बळींची संख्या आता १३ झाली आहे. नव्याने आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमुळे पेठरोडवरील संपूर्ण फुलेनगर परिसर शुक्रवारी सील केला जाणार असल्याची माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली.
नाशिक शहरात आढळलेल्या ३० पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पंचवटीच्या विविध भागांमधील ७ रुग्णांचा समावेश आहे. याशिवाय सिडको येथील ९, खोडेमळा, वडाळा येथील ८, पखालरोड येथील २, सातपूर येथील १, अंबड लिंकरोड येथील १, गंजमाळ येथील २ व्यक्ती यांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या बाधितांची संख्या १३८४ असली तरी त्यापैकी ९१९ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७९ व्यक्तींना कोरोनाच्या बाधेमुळे प्राण गमवावे लागले आहे. मालेगावमध्ये मिळालेल्या पॉझिटिव्ह अहवालांमध्ये जळगाव जिल्ह्यातील २ तसेच मुंबई येथील २ असे चौघे जिल्ह्याबाहेरील रुग्ण आढळून आले आहेत.
मालेगावी दोन बालक बाधित
मालेगाव शहरात आढळलेल्या ९ पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये २ बालकांचा समावेश आहे. यापूर्वीही मालेगाव तसेच जिल्ह्यामध्ये लहान बालके पॉझिटिव्ह आढळली आहेत. दरम्यान, गुरुवारी दिवसभरात जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये १४९ संशयित रुग्ण दाखल झाले असून, त्यांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.