बस अपघातात ३० प्रवासी जखमी
By Admin | Published: October 8, 2016 12:43 AM2016-10-08T00:43:06+5:302016-10-08T00:49:46+5:30
दुर्घटना : सप्तशृंगगड ते नांदुरीदरम्यान दोन बसेसची जोरदार धडक
वणी : सप्तशृंगगडावरून दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या एसटी बसला मागून आलेल्या दुसऱ्या एसटी बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात ३० भाविक जखमी झाले. जखमी भाविक औरंगाबाद जिल्ह्यातील व सिन्नर येथील आहेत. शुक्र वारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास सप्तशृंगगड ते नांदुरी रस्त्यावर हा अपघात झाला.
एमएच १४ बीटी-३५९३ ही मालेगाव आगाराची बस भाविकांना घेऊन गडावरून नांदुरी येथे येत असताना नांदुरीपासुन दोन किलोमीटर अंतरावर एक मृत म्हैस रस्त्यावर पडली होती. पहाटेच्या वेळी दाट धुके असल्यामुळे वाहनचालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही. जवळ गेल्यावर हेडलाईटच्या प्रकाशात चालकाने म्हैस बघितली. अपघात होऊ नये म्हणून ब्रेक दाबले. मात्र त्याच सुमारास कळवण आगाराची दुसरी बस मागाहून आली व चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस पुढील बसवर धडकली. सुदैवाने या दोन्ही बस रस्त्यावरच अडकल्या अन्यथा खोलगट आकाराच्या दरीसद्दश भागात रस्त्यापलीकडे गेल्या असत्या तर अनर्थ ओढवला असता.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक देवीदास पाटील व पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत वाहतुकीची कोंडी झाली होती. कारण शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त गडावर २४ तास मंदिर खुले असल्याने दर्शनार्थींसाठी बसच्या फेऱ्या सुरू आहेत. ४५ मिनिटांनी वाहतूक पूर्ववत झाली. तोपर्यंत काही जखमींना न्यासाच्या व काही जखमींना वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींवर सप्तशृंगगड व वणीच्या ग्रामीण रु ग्णालयात उपचार करण्यात आले.
जखमींना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी ५०० रुपये सहायक
वाहतूक अधीक्षक बी. एम. राठोड व वाहतूक निरीक्षक सुरेश पवार यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
(वार्ताहर)