त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ३० गावांचा पाणीप्रश्न मिटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 06:22 PM2018-09-14T18:22:42+5:302018-09-14T18:23:18+5:30
इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सहा लघुपाटबंधारे योजनांना औरंगाबादच्या जलसंधारण महामंडळाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. या योजनांमुळे आदिवासी भागातील ३० गावांचा पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत होईल. यामुळे तीन हजार ४६० हेक्टर क्षेत्र यामुळे पाण्याखाली येणार आहे.
त्र्यंबकेश्वर/घोटी : इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सहा लघुपाटबंधारे योजनांना औरंगाबादच्या जलसंधारण महामंडळाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. या योजनांमुळे आदिवासी भागातील ३० गावांचा पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत होईल. यामुळे तीन हजार ४६० हेक्टर क्षेत्र यामुळे पाण्याखाली येणार आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव, राऊतमाळ, खडकओहोळ, वरसविहीर, कळमुस्ते, खोरीपाडा (गोलदरी) या लघुपाटबंधारे योजनांना जलसंधारण महामंडळाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. या सर्व योजनांसाठी लाखोंची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे वावी हर्ष, टाके देवगाव, बर्ड्याची वाडी, राऊतमाळ, शिरसगाव, जांभूळपाडा, कामतपाडा, भूतमोखाडा, खडकओहोळ, ओझरखेड, विराचा पाडा, भूतारखेत, गोलदरी, देवडोंगरा, देवडोंगरी, बाफनविहीर, वरसविहीर, खरवळ, वीरनगर, नांदगाव कोहळी, आडगाव देवळा, बटक पाडा, कळमुस्ते, दुगारवाडी, उंबर्डे आदी २५ ते ३० गावांचा पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे.
आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, मंत्री राम शिंदे यांना आमदार निर्मला गावित यांनी दुर्लक्षित आणि मागास असणाऱ्या त्र्यंबकेश्वर तालुक्याबाबत अधिक माहिती दिली. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, रोजगाराचा प्रश्न, कुपोषण, स्थलांतर कमी होण्यासाठी या योजना उपयोगी ठरतील.