३० क्विंटल कांदा चोरीस
By admin | Published: October 1, 2015 12:10 AM2015-10-01T00:10:14+5:302015-10-01T00:10:50+5:30
३० क्विंटल कांदा चोरीस
द्याने : अंबासन येथील अरुण जगन्नाथ कोर यांच्या कांदा चाळीतून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ३० क्विंटल कांदा चोरून नेला असून, जायखेडा पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अंबासनसह परिसरात भुरट्या चोऱ्यांचा सुळसुळाट वाढला असून त्यांनी आता आपला मोर्चा शेतकऱ्यांच्या कांदा चाळीकडे वळविल्याने घबराट पसरली आहे. कांद्याला सोन्यासारखा भाव मिळू लागल्याने कांदा चोरीचे प्रमाण वाढले आहे. अरुण कोर यांच्या शेतातील चाळीत साठवून ठेवलेला कांदा चोरट्यांनी लंपास केला. दुष्काळावर मात करीत शेतकऱ्यांनी कांद्याचे पीक घेतले होते. त्यातील काही कांदा मिळेल त्या भावात विकला होता. कोर यांचा मुलगा रात्री ८ वाजता कांदा चाळीला कुलूप लावून घरी परतला. त्यानंतर सकाळी पाच वाजेच्या सुमारास दुभत्या जनावरांचे दुध काढण्यासाठी कोर गेले असता त्यांना चाळीत साठविलेला कांदा चोरीस गेल्याचे लक्षात आले. (वार्ताहर)