दुशिंगपूर शिवारात लांडग्यांच्या हल्ल्यात ३० मेंढ्यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2021 10:57 PM2021-12-02T22:57:42+5:302021-12-02T22:57:42+5:30
सिन्नर: तालुक्यातील वावीजवळील दुशिंगपूर शिवारात लांडग्यांच्या हल्ल्यात ३० मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे पशुपालकाचे मोठे नुकसान झाले आहे.
सिन्नर: तालुक्यातील वावीजवळील दुशिंगपूर शिवारात लांडग्यांच्या हल्ल्यात ३० मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे पशुपालकाचे मोठे नुकसान झाले आहे.
लव्हारे-कसारे, ता. संगमनेर येथील मेंढपाळ बाबासाहेब हरिभाऊ सैंदर हे मेंढ्या चारण्यासाठी दुशिंगपूर शिवारात आले होते. बुधवारी (दि.२) दिवसभर आणि रात्री पाऊस असल्याने सैंदर यांनी त्यांच्या मेंढ्या एका जागी बसविल्या होत्या. रात्री एक वाजेच्या सुमारास दहा ते बारा लांडग्यांच्या कळपाने या मेंढ्यांवर हल्ला चढविला. मेंढ्यांचा आरडाओरडा ऐकू आल्याने सैंदर कुटुंबाने धाव घेतली मात्र १० ते १२ लांडगे असल्याने त्यांचा नाईलाज झाला. या हल्ल्यात ३० मेंढ्या ठार झाल्या. १२ कोकरे व १८ मेंढ्या यात दगावल्या. घटनास्थळी १८ मेंढ्या मृत अवस्थेत आढळून आल्या, तर १२ मेंढ्या लांडग्यांच्या कळपाने ओढून नेल्या. मेंढपाळ सैंदर यांनी दुपारी घटनेची माहिती वनविभागाला दिल्यानंतर सिन्नरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनसेवक नारायण वैद्य यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. घटनेची माहिती वावीचे पशुधन विकास अधिकारी अविनाश पवार यांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन पाच जखमी मेंढ्यांवर उपचार केले. या घटनेत सैंदर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
दिवसभरात शंभरावर मेंढ्या मृत
सिन्नर तालुक्यात गुरुवार मेंढ्यांसाठी काळा दिवस ठरला. कडाक्याच्या थंडीमुळे जायगाव शिवारात २० व वडगावपिंगळा शिवारात ५२ मेंढ्यांचा गारठून मृत्यू झाला. नांदूरशिंगोटे येथीही थंडीमुळे ४ मेंढ्या मृत्युमुखी पडल्या. हे ही कमी म्हणून की काय दुशिंगपूर शिवारात लांडग्यांच्या हल्ल्यात ३० मेंढ्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे गुरुवारी सिन्नर तालुक्यात मेंढ्यांवर संक्रांत आल्याचे दिसून आले. जवळपास दिवसभरात १०६ मेंढ्यांचा मृत्यू झाला.