३०० किलो वांग्याचे भरीत अन् बाजरीच्या भाकरी
By admin | Published: December 16, 2015 10:49 PM2015-12-16T22:49:47+5:302015-12-16T22:52:56+5:30
चंपाषष्ठी : प्रतिजेजुरी मऱ्हळमध्ये सात गावांचे भाविक जागरण गोंधळात तोडणार एकच लंगर
शैलेश कर्पे सिन्नर
प्रतिजेजुरी म्हणून ख्याती असलेल्या सिन्नर तालुक्यातील मऱ्हळ खुर्द येथील खंडेराव महाराज मंदिरात चंपाषष्ठी उत्सवाची जय्यत तयारी करण्यात येत आहे. परिसरातील सात गावांचे भाविक मंदिरात जागरण-गोंधळ घालणार असून, एकच लंगर तोडला जाणार आहे. गाव व परिसरातील भाविकांना महाप्रसाद वाटण्यासाठी ३०० किलो वांग्याचे भरीत व सुमारे २५०० बाजरीच्या भाकरी करण्याची तयारी सुरू आहे.
सिन्नर तालुक्यातील मऱ्हळ खुर्द येथे माघ पौर्णिमेला म्हणजे साधारणत: फेबु्रवारी महिन्यात मोठी यात्रा भरते. त्याचबरोबर येथे चंपाषष्ठी उत्सवही मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. चंपाषष्ठी उत्सवानिमित्त गुरुवारी सायंकाळी ७ वाजता खंडेराव महाराजांची आरती व रात्री ८ वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. महाप्रसाद म्हणून वांग्याचे भरीत व बाजरीची भाकरी करण्याची प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून जोपासली जात आहे. मऱ्हळ खुर्द, मऱ्हळ बुद्रूक, सुरेगाव, पांगरी, निऱ्हाळे, कणकोरी, फुलेनगर या सुमारे सात गावांतील भाविक यावेळी होणाऱ्या सामुदायिक जागरण गोंधळाच्या कार्यक्रमास उपस्थित राहातात. सुमारे दीड ते दोन हजार भाविकांच्या उपस्थितीत पहाटे लंगर तोडण्याचा कार्यक्रम पार पडतो.
एकच जागरण-गोंधळ व लंगर तोडण्याच्या कामाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. गोंधळी म्हणून पाटपिंप्री येथील तर जागरणी म्हणून निमगाव-गुळवंच येथील मंडळ हजेरी लावणार आहे. सुमारे दीड ते दोन हजार भाविकांच्या महाप्रसादासाठी ३०० किलो वांग्यांचे भरीत व सुमारे २५०० भाकरी बनविण्यात येणार आहेत.
चंपाषष्ठी उत्सवानिमित्त मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली असून, मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या गजरात जागरण- गोंधळ व लंगर तोडण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. उत्सव पार पाडण्यासाठी मऱ्हळ खुर्द, मऱ्हळ बुद्रूक, सुरेगाव व पांगरी येथील ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत.