३१ आदिवासी बहुल गावे-पाडे कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:22 AM2021-05-05T04:22:45+5:302021-05-05T04:22:45+5:30
पहिल्या लाटेत इंदोरे येथे मुंबईहून आरोग्य विभागातील एक कर्मचारी गावी आल्यावर तो पॉझिटिव्ह आढळला. त्यानंतर दिंडोरी तालुक्यातील ...
पहिल्या लाटेत इंदोरे येथे मुंबईहून आरोग्य विभागातील एक कर्मचारी गावी आल्यावर तो पॉझिटिव्ह आढळला. त्यानंतर दिंडोरी तालुक्यातील अनेक गावात कोरोनाचा शिरकाव झाला. दुसऱ्या लाटेतही या गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. मातेरेवाडी, खेडगाव, करंजवन, म्हेळुस्के, उमराळे ही गावे हॉटस्पॉट बनली. गेल्या वेळी जी गावे कोरोनामुक्त राहिली त्या गावातही कोरोनाचा शिरकाव झाला. असे असताना तालुक्यातील पश्चिम भागातील पिंपरज, सूर्यगड, विळवंडी, वाग्याची बारी, कुयंबी, मोखनल, गांडोळे, देवघर, चिमन पाडा, गोळशी, बोरवन, गवळीपाडा, रडतोंडी, टेंटमाळ, घाटाळबारी, चिकाडी, सावर पातळी, शिंदपाडा, दह्याची वाडी, वागदेव पाडा, भोकरपाडा, मोरवन पाडा, चाफ्याचा पाडा, रानपाडा, जोरण पाडा, सादराळे, कोल्हेर पाडा, पायरपाडा, गोलदरी, वांजुळ पाडा, माळेगाव काजी या ३१ आदिवासीबहुल गावपाड्यांनी अद्याप तरी कोरोनाचा शिरकाव होऊ दिलेला नाही. या गावपाड्यांवर शासनाने ठरवून दिलेले नियम-अटी पाळल्या जात आहेत. गावात स्वच्छता राखण्याबरोबरच औषध फवारणी केली जात आहे. आरोग्य विभागातर्फे सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली आहे. काही ठिकाणी लसीकरण शिबिर आयोजित केले आहे. त्यामुळे कोरोनाला वेशीबाहेर ठेवण्यात हे गाव-पाडे यशस्वी झाले आहेत.
कोट.....
गावात औषध फवारणी स्वच्छता ठेवली जात आहे. तसेच अनावश्यक घराबाहेर जाणे टाळले जात असून सर्व ग्रामस्थ मास्कचा नियमित वापर करतात. गावात पूर्ण सर्वेक्षण करण्यात आले आहे. तसेच लसीकरण करण्यात आले आहे. गाव कोरोनामुक्त राहावे यासाठी सर्व ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत.
- भरत भोये, सरपंच, गांडोळे
कोट.....
आमचे गाव तालुका मुख्यालयाच्या अगदी जवळ असूनही पहिल्या लाटेत कोविडपासून कोसो दूर होते.
मात्र दुसऱ्या लाटेत आजपर्यंत आठ-दहा ग्रामस्थांना कोविडची लागण झाली, आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनानुसार पाॅझिटिव्ह रुग्णांना गृहविलगीकरण करून कोविडचे उपचार दिले जात आहेत. आता गावातील सर्वच्या सर्व बाधित रुग्ण पूर्णतः बरे होत आहेत.
- दत्तात्रय भेरे, उपसरपंच, वनारवाडी