मनपा शाळांतील ३१५ शिक्षकांच्या बदल्या
By admin | Published: May 26, 2016 11:05 PM2016-05-26T23:05:56+5:302016-05-27T00:49:10+5:30
समुपदेशनावर भर : ३१ मे पर्यंत रुजू होण्याचे आदेश
नाशिक : शिक्षक बदलीचा कार्यक्रम म्हटला की, त्यात वशिलेबाजी, राजकीय हस्तक्षेप, संघटनांचे दबावगट या साऱ्या गोष्टी आल्याच. परंतु, महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच कसलाही गाजावाजा न होता शाळांमधील शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पार पडली असून आॅनलाइन प्रक्रिया राबविताना समुपदेशनावर अधिक भर देण्यात आला आहे. वास्तव्य ज्येष्ठताक्रमानुसार मनपा शाळांमधील ३१५ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. शिक्षण विभागाने बदलीपात्र शिक्षकांना ३१ मे पर्यंत संबंधित शाळांवर रुजू होण्याचे आदेश काढले आहेत.
महापालिकेच्या शाळांमध्ये एकूण ९३६ शिक्षक कार्यरत आहेत. गेल्या चार-पाच वर्षांत शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया थांबलेली होती. यापूर्वी, शिक्षकांच्या बदल्या हाच एकमेव अजेंडा शिक्षण समितीचा असायचा. त्यातून मोठ्या प्रमाणावर वादही निर्माण व्हायचे. शिक्षण मंडळ बरखास्त होऊन शासनाने शिक्षण समितीची स्थापना करण्याचे आदेश दिल्यानंतर शिक्षण विभाग हा पूर्णत: महापालिकेच्या कार्यकक्षेत आला. मनपा आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी महापालिकेतील अधिकारी, अभियंत्यांसह लिपिक या संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या केल्यानंतर शिक्षकांच्या बदल्यांचाही विषय समोर आला. त्यानुसार, यंदा प्रथमच शिक्षण विभागामार्फत शिक्षकांच्या समुपदेशनावर भर देत रिक्त जागा दाखवून आॅनलाइन पद्धतीने बदलीचा कार्यक्रम राबविण्यात आला. शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी उमेश डोंगरे यांनी त्यानुसार वास्तव्य ज्येष्ठता यादी तयार करून शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया नुकतीच पूर्ण केली. त्यानुसार, ५७२ पैकी २१६ उपशिक्षक, १०३ पैकी ४२ मुख्याध्यापक आणि २६१ पैकी ५७ पदवीधर शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्यांची प्रक्रिया राबविताना अपंग, विधवा, गंभीर आजारी तसेच ज्यांचा सेवाकाळ एक वर्षापुरता राहिला आहे, अशा शिक्षकांना त्यातून वगळण्यात आले आहे. बदलीपात्र शिक्षकांना त्यांच्या बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी त्यांना ३१ मे पर्यंत कार्युमक्त करण्याचे आदेश शिक्षण विभागाने संबंधित शाळा मुख्याध्यापकांना काढले आहेत.