दिंडोरीच्या विकासासाठी पाच वर्षांत ३२ कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:35 AM2021-02-05T05:35:34+5:302021-02-05T05:35:34+5:30
दिंडोरी नगरपंचायतीचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याचे औचित्य साधत वचनपूर्ती प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रचना ...
दिंडोरी नगरपंचायतीचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याचे औचित्य साधत वचनपूर्ती प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रचना जाधव यांनी सांगितले, दिंडोरी शहरात पूर्वी सांडपाण्यासाठी व्यवस्था नव्हती, त्यामुळे आरोग्याच्या समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत होते, त्यास प्राधान्य देत शहरातील अनेक भागांत भूमिगत गटारीची कामे पूर्ण करण्यात आली. पूर्वी शहरांतर्गत रस्त्यांच्या दुरुस्तीलाही निधी मिळत नव्हता, मात्र आता शहरातील अनेक रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाले आहे, तर काही प्रभागांमध्ये कामे सुरू आहेत. शहराचा वाढता विस्तार बघता रस्त्याच्या कामास व शहर सुशोभीकरण करण्यास प्राधान्य देत असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातून जाणारा राज्यमार्ग क्रमांक तीन या रस्त्यामुळे वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागते, नाशिक-कळवण, सापुतारा या रस्त्यावर वाहनांची मोठी रेलचेल असते, त्यामुळे नागरिकांना तासनतास वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते, त्याला आळा घालण्यासाठी पालखेड चौफुली येथे सिग्नल यंत्रणा बसविण्यात येणार आहे, त्याचा प्रस्ताव संबंधित विभागाकडे दिला असून, मंजुरी येताच काम पूर्ण केले जाईल, असेही जाधव यांनी स्पष्ट केले. यावेळी उपनगराध्यक्ष कैलास मवाळ, भाऊसाहेब बोरस्ते, अविनाश जाधव उपस्थित होते.
इन्फाे
जलतरण तलावाचे काम पूर्णत्वास
महाराष्ट्रात कोणत्याही नगरपंचायतीने आजपर्यंत जलतरण तलाव बांधण्याचे धाडस केले नाही, मात्र दिंडोरी नगरपंचायतीने नगरउत्थान योजनेअंतर्गत १ कोटी १५ लाख रुपये उपलब्ध करत जलतरण तलावाचे बांधकाम पूर्णत्वास नेले आहे, तसेच नगरपंचायत हद्दीत तीन मोठी उद्याने बांधली आहेत, क्रीडा संकुलाचा प्रस्ताव मंत्रालय स्तरावर असून, तालुक्याच्या ठिकाणी भव्य क्रीडा संकुल उभारण्याचा मानस रचना जाधव यांनी व्यक्त केला.