बंद कालव्यावर बससाठी ३२ किलोमीटर डेडिकेटेड रोड

By sanjay.pathak | Published: September 29, 2018 12:45 AM2018-09-29T00:45:51+5:302018-09-29T00:46:40+5:30

महापालिकेच्या वतीने साधारण बससेवा सुरू करण्यात येत असली तरी शहरातून जाणाऱ्या गंगापूर धरणाच्या उजव्या कालव्यावर ३२ किलोमीटर मार्गावर बीआरटीएसच्या धर्तीवर डेडिकेटेड बस रूट सुरू करण्यात येणार आहे.

 32 kilometers Dedicated Road for buses in closed canal | बंद कालव्यावर बससाठी ३२ किलोमीटर डेडिकेटेड रोड

बंद कालव्यावर बससाठी ३२ किलोमीटर डेडिकेटेड रोड

Next

नाशिक : महापालिकेच्या वतीने साधारण बससेवा सुरू करण्यात येत असली तरी शहरातून जाणाऱ्या गंगापूर धरणाच्या उजव्या कालव्यावर ३२ किलोमीटर मार्गावर बीआरटीएसच्या धर्तीवर डेडिकेटेड बस रूट सुरू करण्यात येणार आहे. केवळ बस मार्गच नव्हे, तर त्याच्या शेजारी फुटपाथ आणि त्याच्या बाजूला सायकल ट्रॅक असे तिहेरी मार्ग असणार आहे.  नाशिक महापालिकेच्या वतीने शहर बस वाहतूक सुरू करण्यात येणार असून, त्यासंदर्भात गेल्या १९ सप्टेंबर रोजी झालेल्या महासभेत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. काही वर्षांपूर्वी नाशिक महापालिकेकडे बीएआरटीएसचा प्रस्ताव आला होता; मात्र त्यावेळी शहरातील मोजकेच रस्ते रूंद असल्याने अन्य मार्गांवर ही सेवा राबविता येणार नाही म्हणून हा प्रस्ताव नाकारण्यात आला होता. आता महापालिकेच्या वतीने पारंपरिक बससेवाच सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी मार्ग निश्चितीचे काम सुरू आहे. त्या अंतर्गत गंगापूर धरणाच्या बंदिस्त कालव्यावर ३२ किलोमीटर लांबीचा डेडिकेटेड रूट साकारण्यात येणार आहे. हा रस्ता किमान बारा मीटर रूंद असेल, त्या शेजारी तीन मीटर रुंदीचा पादचारी मार्ग आणि त्यापुढे तीन मीटर रुंदीचा फुटपाथ असे नियोजन करण्यात आले आहे. गोदावरी नदीच्या उजव्या कालव्याच्या माध्यमातून नाशिक महापालिकेने थेट जलवाहिनी योजना राबविली असून, त्यावेळी हा कालवा महापालिकेच्या ताब्यात आहेत. त्याचे भाडे जलसंपदा विभाग घेत असते; मात्र आता या कालव्याच्या सीमांकनाचे काम नऊ ठिकाणी सुरू असून, सहा ठिकाणचे काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर बससेवा, फुटपाथ आणि सायकल ट्रॅकचा समावेश असलेला मॉडेल रोड साकारण्यात येणार आहे.  सदरचा रस्ता तयार करतानाच पावसाळी गटार योजना आणि क्रॉसिंग पाइपची कामे करून घेण्यात येणार आहेत. त्यामुळे एकदा हा रस्ता तयार झाल्यानंतर पुन्हा त्याचे खोदकाम करण्याची गरज पडणार नाही, असे नियोजन महापालिका करणार आहे. सध्या महापालिकेची जलवाहिनी कालव्याखालून जात असली तरी अनेक ठिकाणी त्यात बदल करावे लागणार आहे. काही ठिकाणी पाइप क्रॉसिंगच्या जागादेखील बदलाव्या लागणार आहेत तर काही ठिकाणी पाइपलाइनच काही प्रमाणात स्थलांतरित करावी लागणार आहे. तथापि, सीमांकनानंतर यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे.
ट्राम, मोनो रेलचे होते प्रस्ताव
गंगापूर धरणापासून थेट नाशिकरोडपर्यंत जाणाºया या कालव्यामुळे तीन ते चार विभाग जोडले जातात. त्यामुळे या मार्गावर कोणताही वाहतूक प्रकल्प राबविला तर तो खूप चांगल्या पद्धतीने उपयोगात येऊ शकतो. त्यामुळे महापालिकेच्या ताब्यात असलेल्या ३२ किलोमीटर लांबीच्या बंदिस्त कालव्यावरून यापूर्वी ट्राम, मोनोरेलसारखे तत्सम उपाय अनेकदा सुचविण्यात आले होते. मात्र, त्यावर निर्णय झाला नव्हता. आता मात्र त्यावर सार्वजनिक वाहतुकीचाच प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या कालव्यावर काही ठिकाणी अतिक्रमणेदेखील आहेत; परंतु एकंदर रस्त्यात फारसे अडथळे नाहीत.
पाच जॉगिंग ट्रॅक नष्ट होणार?
महापालिकेच्या वतीने बंदिस्त कालव्यावर बस रूट साकारला जाणार असला तरी सध्या या कालव्यावर असलेले किमान पाच जॉगिंग ट्रॅक असून, ते नष्ट होणार काय? असा प्रश्न आहे. सध्या सातपूर विभागात पाइपलाइन रोडवर, पश्चिम विभागात कृषीनगर आणि शिरवाडकर जॉगिंग ट्रॅक यासह पाच जॉगिंग ट्रॅक असून, ते चांगले वापरात आहेत; परंतु बसमुळे एक तर ते नष्ट करून त्याची रचना बदलावी लागण्याची शक्यता आहे.

Web Title:  32 kilometers Dedicated Road for buses in closed canal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.