वास्तूशास्त्र पदवीसाठी ३२० प्रवेश क्षमता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 10:17 PM2020-07-20T22:17:37+5:302020-07-21T02:04:36+5:30
नाशिक : बारावीनंतर विद्यार्थ्यांचा कल अभियांत्रिकी आणि औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमासोबत आणि तंत्र आणि व्यवसाय शिक्षणाकडेही वाढतो आहे. त्यामुळे नाशिक विभागात इंजिनिअरिंग आणि फार्मसी महाविद्यालयासोबतच आर्किटेक्चर आणि हॉटेल मॅनेजमेंट यांसारखे व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांचीही महाविद्यालये उभी राहत आहे.
नाशिक : बारावीनंतर विद्यार्थ्यांचा कल अभियांत्रिकी आणि औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमासोबत आणि तंत्र आणि व्यवसाय शिक्षणाकडेही वाढतो आहे. त्यामुळे नाशिक विभागात इंजिनिअरिंग आणि फार्मसी महाविद्यालयासोबतच आर्किटेक्चर आणि हॉटेल मॅनेजमेंट यांसारखे व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांचीही महाविद्यालये उभी राहत आहे. सध्या नाशिक विभागात स्थापत्यशास्त्र तथा आर्किटेक्चर अभ्यासक्रम असलेली सात महाविद्यालये असून, त्यात ३२० विद्यार्थ्यांना प्रवेशाची क्षमता आहे, तर हॉटेल मॅनेजमेंट पदवी अभ्यासक्रमाची नाशिक विभागात केवळ दोन महाविद्यालय असून, याठिकाणी ९० विद्यार्थ्यांना प्रवेशाची क्षमता आहे.
नाशिक विभागात नगरमध्ये दोन महाविद्यालयांमध्ये ८० प्रवेशक्षमता असून, जळगावच्या एक महाविद्यालयात ४०, तर नाशिकच्या चार महाविद्यालयांमध्ये दोनशे विद्यार्थ्यांना प्रवेशाची क्षमता आहे, तर धुळे व नंदुरबार जिल्ह्यात आर्किटेक्चरचे एकही महाविद्यालय अद्याप सुरू झालेले नाही. हीच परिस्थिती हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी (बीएचएमसीटी) अभ्यासक्रमाच्या बाबतीतही दिसून येते. या अभ्यासक्रमाची विभागात केवळ दोन महाविद्यालय आहेत. यातील अहमदनगरच्या एका महाविद्यालयात ३० विद्यार्थ्यांना प्रवेशाची क्षमता आहे, तर नाशिकमध्ये एका महाविद्यालयात ६० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी शाखेच्या पदवीसोबतच पदविका (डीएचएमसीटी) अभ्यासक्रमही उपलब्ध असून, विभागात या अभ्यासक्रमाचे केवळ नाशिकमध्ये एकच महाविद्यालय आहे. याठिकाणी केवळ ६० विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमास प्रवेश मिळू शकतो.