वीजनिर्मिती क्षमतेत ३२८० मेगावॉटची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 01:26 AM2018-11-13T01:26:16+5:302018-11-13T01:26:51+5:30

महानिर्मिती कंपनीच्या वीजनिर्मिती क्षमतेमध्ये ३२८० मेगावॉट इतकी वाढ झालेली असल्यामुळे राज्य आता भारनियमनमुक्त झाल्याचा दावा एमएसईबी होल्डिंग कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी केला आहे.

 3280 MW increase in power capacity | वीजनिर्मिती क्षमतेत ३२८० मेगावॉटची वाढ

वीजनिर्मिती क्षमतेत ३२८० मेगावॉटची वाढ

Next

नाशिक : महानिर्मिती कंपनीच्या वीजनिर्मिती क्षमतेमध्ये ३२८० मेगावॉट इतकी वाढ झालेली असल्यामुळे राज्य आता भारनियमनमुक्त झाल्याचा दावा एमएसईबी होल्डिंग कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी केला आहे. महावितरण कंपनीच्या चार वर्षांच्या कामांची माहिती देण्यासाठी पाठक नाशिकमध्ये आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत पाठक यांनी सांगितले की, कंपनीने ५० मेगावॉट सौर ऊर्जा प्रकल्प व ३२३० मेगावॉटचे औष्णिक ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केल्यामुळे राज्यातील विजेची उपलब्धता वाढली आहे. दिवाळीत पाचशे ते साडेपाचशे मेगावॉटची तूट निर्माण झाल्याने काही काळ भारनियमन करावे लागले. परंतु आता वाढविलेली वीजनिर्मिती आणि खासगी वीजनिर्मिती कंपन्यांशी केलेल्या करारामुळे विजेसाठी राज्य स्वयंपूर्ण बनल्याचे पाठक म्हणाले. सद्यपरिस्थितीत राज्यात सर्व भागात अखंडित वीजपुरवठा सुरू असून, कृषी ग्राहकांना चक्राकार पद्धतीने दररोज ८ ते १० तास वीजपुरवठा करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.  गेल्या २२ आॅक्टोबर रोजी तब्बल २४,९३२ मेगावॉट ही सर्वाधिक विजेची मागणी नोंदविण्यात आली होती. ही मागणी पूर्ण करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्णातील मेळघाट या अतिदुर्गम आदिवासी उपयोजना क्षेत्रात १३२ केव्ही, धारणी उपकेंद्र तसेच नेपानगर ते धारणी अशी ६० किमीची आंतरराज्य वाहिनीची उभारणी करण्यात आली. त्यामुळे या भागातील १५२ गावांतील सुमारे १२००० गावकऱ्यांना सुरळीत व अखंडित वीजपुरवठ्याचा लाभ मिळत असल्याचा दावाही पाठक यांनी केला.
१ हजार दिवसांत १४ हजार गावात वीज
ज्या गावात वीज पोहचलेली नाही अशा गावांमध्ये वीज जोडणी देण्यासाठीची योजना आखण्यात आली आहे. त्यानुसार १८ हजार गावांमध्ये वीज पोहचविण्याचे उद्दिष्ट असून, केवळ १ हजार दिवसांत १४ हजार गावांमध्ये वीज पोहचली आहे. येत्या जानेवारीपर्यंत उर्वरित गावांमध्येदेखील वीज पोहोचेल असेही पाठक यांनी यावेळी सांगितले. नंदुरबार आणि गडचिरोलीतील अतिदुर्गम भागात अद्याप वीज पोहोचलेली नाही. तेथेही कामे लवकर सुरू होणार आहेत.

Web Title:  3280 MW increase in power capacity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.