विभागात पर्यटन विकासासाठी ३३ कोटी मंजूर
By Admin | Published: April 6, 2017 01:22 AM2017-04-06T01:22:37+5:302017-04-06T01:22:55+5:30
नाशिक : विभागातील विविध पर्यटन व धार्मिक स्थळांच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३३ कोटींहून अधिक निधीला मंजुरी दिली
नाशिक : पर्यटनाला चालना मिळण्यासाठी नाशिक विभागातील विविध पर्यटन व धार्मिक स्थळांच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३३ कोटींहून अधिक निधीला मंजुरी दिली असून, त्यातील ९ कोटी रुपयांचा निधीही तत्काळ वितरित करण्यात आला आहे. पर्यटन विकासात मात्र अहमदनगर व नंदुरबारला झुकते माप देण्यात आले असून, धुळे, नंदुरबारला पाने पुसण्यात आलेली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पर्यटनमंत्री जयकुमार रावल व राज्यमंत्री मदन येरावार यांनी नाशिक विभागातील पर्यटन विकासाचे वीस प्रस्ताव सादर केले. त्यासाठी अंदाजीत ३३ कोटी ६८ लाख ८७ हजार रुपये खर्च अपेक्षित असून, मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावांना मान्यता देत ९ कोटी ३० लाख पाच हजार रुपये तत्काळ वितरित करण्याचे आदेशही देण्यात आले. या प्रस्तावांमध्ये नाशिक जिल्ह्णातील फक्त दोनच प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे. त्यात कावनई येथील कपिलधारा येथील विकासकामे, देवळा येथील दुर्गा माता मंदिर परिसर विकासकामे अशा दोनच कामांचा समावेश असून, त्यासाठी एक कोटी ४० लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील आठ कामे मंजूर करण्यात आले आहेत. त्यात नगरचा भुईकोट किल्ला विकास, हजरत मिरावली पहाड येथे रस्ता स्ट्रीट लाईट आणि प्रसादालय इमारत बांधकाम, श्री क्षेत्र देवगड येथील यात्री निवासाचे बांधकाम, निघोज ते निघोज कुंड पर्यटन स्थळाकडेजाणारा रस्ता तयार करणे, सरला बेट विकास, नेवासा तालुक्यातील कामे, नेवासा तालुक्यातील जेऊर येथील यमाई माता मंदिर परिसर सुधारणा करणे, देडगाव येथील बालाजी मंदिर परिसर सुधारणा करणे या आठ कामांचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्णातील पाचोरा नगरपरिषद क्षेत्रातील हिवरा नदीपात्रालगत श्रीराम मंदिर परिसराचा विकास करणे या एकमेव कामाचा समावेश आहे. (प्रतिनिधी)