थकीत पाणीपट्टीबाबत ३३ हजार नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 12:51 AM2019-07-06T00:51:40+5:302019-07-06T00:52:11+5:30
अंदाजपत्रकातील कामांची तरतूद आणि नगरसेवकांच्या कामांच्या वाढत्या अपेक्षा यामुळे महापालिकेने कर थकविणाऱ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. पाणीपट्टीची ४३ कोटी रुपयांची थकबाकी वसुलीसाठी प्रशासनाने आक्रमक पद्धतीने प्रयत्न सुरू केले
नाशिक : अंदाजपत्रकातील कामांची तरतूद आणि नगरसेवकांच्या कामांच्या वाढत्या अपेक्षा यामुळे महापालिकेने कर थकविणाऱ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. पाणीपट्टीची ४३ कोटी रुपयांची थकबाकी वसुलीसाठी प्रशासनाने आक्रमक पद्धतीने प्रयत्न सुरू केले असून, पट्टी थकविणाºया ३३ हजार थकबाकीदारांना नोटिसा बजावल्या आहेत, तर नोटिसांना न जुमानणाऱ्यांच्या नळजोडण्या तोडण्याची कारवाईदेखील तीव्र केली आहे. शहरातील २ हजार ३६२ नळजोडणीधारकांचे नळ कनेक्शन तोडले आहे.
महापालिकेच्या वतीने दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यानंतर करवसुलीची कारवाई सुरू करण्यात येते. परंतु यंदा नवे आर्थिक वर्ष सुरू होतानाच महापालिकेने वसुलीवर भर दिला आहे. गेल्या दीड दोन वर्षांत नगरसेवकांच्या प्रभागात साधी साधी कामे झालेली नाहीत. त्यामुळे त्यांचा दबाव प्रशासनावर वाढत आहे. विशेषत: नगरसेवक निधीतील कामे करण्यासाठी नगरसेवक आग्रही आहेत, परंतु ज्या पद्धतीने महसूल वसूल होईल त्याप्रमाणे निधीच्या उपलब्धतेनुसार नगरसेवकांची कामे करण्यात येणार आहे. त्यामुळे घरपट्टीच्या थकबाकीदारांच्या मिळकतींचे लिलाव करतानाच पाणीपट्टीची जवळपास ४३ कोटींची थकबाकी वसूल करण्यासाठी प्रशासन सरसावले आहे. थकबाकीदारांमध्ये नाशिकरोड आणि नाशिक पूर्व विभागातील थकबाकीदारांची संख्या सर्वाधिक आहे.
महापालिकेने घरपट्टी आणि पाणीपट्टी थकविणाºयांवर कारवाई करताना पाणीपट्टीच्या ३३ हजार ८७ थकबाकीदारांना नोटिसा बजावल्या आहेत. या थकबादीराकांकडे ४३ कोटी ८३ लाखांची थकबाकी आहे. हे सर्व थकबाकीदार हे पाच हजार ते ५० हजारांपर्यंतच्या रकमेदरम्यानचे थकबाकीदार आहेत.
सहाही विभागांत धडक मोहीम
महापालिकेने नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई सुरू केली आहे. त्या अंतर्गत आतापर्यंत सहा विभागांत २३६२ नळ कनेक्शन तोडण्यात आले आहे. नाशिक पश्चिम विभागात ५५६ नळजोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. त्याखालोखाल पंचवटी ५६६, नाशिक पूर्व विभागात ३६५, सातपूर ३३३, नाशिकरोड २३६, सिडको विभागात २६५ नळजोडण्या तोडण्यात आल्या आहेत.