३३ हजार गरजूंना मदतीचा हात
By admin | Published: March 2, 2016 11:38 PM2016-03-02T23:38:47+5:302016-03-02T23:40:38+5:30
सेवाव्रत : राज्याच्या शासकीय रुग्णवाहिका सेवेचे तिसऱ्या वर्षांत यशस्वी पदार्पण
अझहर शेख नाशिक
अपघात, पक्षाघात, हृदयविकारचा झटका, सर्पदंश अशा संकटप्रसंगी गरजूंना अत्यावश्यक सेवा मोफत उपलब्ध व्हावी, या उद्देशाने राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वी ‘विशेष रुग्णवाहिका’ रस्त्यावर उतरविल्या. याअंतर्गत शासनाच्या महाराष्ट्र अत्यावश्यक वैद्यकीय सेवेच्या रुग्णवाहिकांनी (१०८ एमईएमएस) दोन वर्षांत जिल्ह्यात ३३ हजार ६६ गरजूंना मदतीचा हात दिला आहे. एमईएमएसच्या आपत्कालीन वैद्यकीय सेवेने तिसऱ्या वर्षांत यशस्वी पदार्पण केले असून, जिल्ह्यात एकूण ४६ रुग्णवाहिकांद्वारे वैद्यकीय सेवा पुरविली जात आहे.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत राज्य शासनाने आपत्कालीन वैद्यकीय सेवा ‘१०८’ या टोल फ्री क्रमांकावर २०१४ साली मोफत उपलब्ध करून दिली. डॉक्टर, अनुभवी चालक, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज ९३७ रुग्णवाहिका राज्यभर धावत आहेत. जिल्ह्यात एकूण ४६ रुग्णवाहिकांमार्फत अत्यावश्यक सेवा पुरविली जात आहे. गरजूंनी ‘१०८’ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधताच सुसज्ज अद्ययावत मदत कक्षातील प्रशिक्षित प्रतिनिधींकडून घटनास्थळाची माहिती घेतली जाते. त्यानंतर तत्काळ संबंधित क्रमांकावर रुग्णवाहिकेचा क्रमांकासह त्या रुग्णवाहिकेतील डॉक्टरांच्या भ्रमणध्वनी क्रमांकाचा लघुसंदेशही पाठविला जातो, जेणेकरून डॉक्टरसोबत संबंधित संपर्क साधून रुग्णवाहिकेबाबतची माहिती घेऊ शकतील. महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातून कोणत्याही ‘नेटवर्क’च्या मार्फत ‘१०८’ क्रमांकाशी संपर्क साधता येतो.