तपोवन परिसरात  ३४ लाखांचा गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 01:20 AM2018-06-13T01:20:55+5:302018-06-13T01:20:55+5:30

शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने तपोवन परिसरातील लक्ष्मीनारायण मंदिराजवळ मंगळवारी (दि़ १२) दुपारी छापा टाकून भाजीपाला वाहतुकीच्या आड गांजाची वाहतूक करणारा आयशर पकडला असून, या वाहनातून ३४ लाख रुपये किमतीचा ६७० किलो गांजा जप्त केला आहे़

34 lakhs of ganja seized in Tapovan area | तपोवन परिसरात  ३४ लाखांचा गांजा जप्त

तपोवन परिसरात  ३४ लाखांचा गांजा जप्त

Next

नाशिक : शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने तपोवन परिसरातील लक्ष्मीनारायण मंदिराजवळ मंगळवारी (दि़ १२) दुपारी छापा टाकून भाजीपाला वाहतुकीच्या आड गांजाची वाहतूक करणारा आयशर पकडला असून, या वाहनातून ३४ लाख रुपये किमतीचा ६७० किलो गांजा जप्त केला आहे़ या प्रकरणी संशयित यतिन अशोक शिंदे (३५, रा़ प्रभातनगर, श्रीगणेश अपार्टमेंट, म्हसरूळ) व सुनील नामदेवराव शिंदे (४७, रा़ मिरचीची पालखेड, ता़ जि़ नाशिक) या दोघांना अटक केली असून, हा गांजा कोठून आणला व त्याची विक्री कोणाला केली जाणार होती, याचा पोलीस शोध घेत आहेत़  गुन्हे शाखा युनिट एकचे सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांना ओडिसा येथून एका आयशरमध्ये बाराशे किलो गांजा येणार असल्याची माहिती गुप्त बातमीदाराद्वारे मिळाली होती़ त्यानुसार सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते, युनिट एकचे सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, उपनिरीक्षक बलराम पालकर,  गुन्हे शोध पथकाचे प्रवीण कोकाटे, वसंत पांडव आदींसह कर्मचाऱ्यांनी तपोवनातील बडा लक्ष्मीनारायण मंदिर परिसरात सापळा रचला होता़  शहर गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित आयशर (एमएच १२ इक्यू १४२९) वाहनास अडवून त्यातील दोघा संशयितांना ताब्यात घेतले़ या वाहनाची तपासणी केली असता भाजीपाल्यासाठी वापरण्यात येणाºया प्लॅस्टिक क्रेटच्या पाठीमागे गोण्यांमध्ये गांजा भरलेला होता़ पोलिसांनी या गांजाचे वजन केले असता ते ६८४ किलो भरले़ ३४ लाख रुपये किमतीचा गांजा व १५ लाख रुपये किमतीचा आयशर असा ४९ लाख रुपयांचा ऐवज जप्त जप्त करण्यात आला आहे़ दरम्यान, तपोवनातील वर्दळीच्या रस्त्यावर सुरू असलेल्या पोलिसांच्या या कारवाईमुळे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती़
हा गांजा कोणासाठी ?
तपोवन परिसरात इतक्या मोठ्या प्रमाणात गांजा कोणी मागविला? या परिसरातील साधू-महंतांसाठी तर हा गांजा आणला गेला नाही ना अशी नागरिकांमध्ये चर्चा होती़ तसेच हा गांजा तपोवनातून भद्रकाली, पंचवटी, म्हसरूळ, नाशिकरोड आदी शहरातील प्रमुख ठिकाणी विक्रीसाठी आणल्याची परिसरात चर्चा होती़
उर्वरित माल कुठे उतरविला का?
गुन्हे शाखेच्या युनिट एकला शहरात बाराशे किलो गांजा येणार असल्याची माहिती मिळाली होती़ मात्र, पोलिसांनी पकडलेला गांजा हा केवळ ६८० किलो असल्याने उर्वरित ५२० गांजा कोठे गेला? असा प्रश्न निर्माण झाला आहे़ उर्वरित गांजा हा संशयितांनी कुठे विक्री केला का, याबाबत पोलीस तपास करीत आहेत़ तसेच आयशर वाहनाचा असलेला नंबरही बनावट असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे़
काळ्या बाजारात गांजा १० हजार रुपये किलो
पोलिसांनी पकडलेल्या गांजाची सरकारी किंमत पाच हजार रुपयांप्रमाणे ३४ लाख रुपये असली तरी रिटेल मार्केटमध्ये एक किलो गांजाची किमत दहा हजार रुपये इतकी आहे़ यापूर्वीही पोलिसांनी भद्रकाली तसेच पंचवटीतील मालेगाव स्टॅण्ड परिसरात गांजा, चरस, भांग हे अमली पदार्थ पकडले होते़ तर काही दिवसांपूर्वीच एमडी नावाचा अमली पदार्थही पोलिसांनी पकडला होता़ या घटनांवरून नाशिक शहरात अमली पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याचे समोर आले आहे़

Web Title: 34 lakhs of ganja seized in Tapovan area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.