३४ शाळांनी प्राप्त केला अल्पसंख्याक दर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 11:48 AM2018-02-14T11:48:49+5:302018-02-14T11:52:16+5:30
आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठींच्या जागांमध्ये घट
नाशिक : शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील २५ टक्के राखीव जागांसाठी जिल्हाभरातून ४६६ शाळांनी नोंदणी केली आहे. मात्र गेल्या वर्षी या प्रक्रियेअंतर्गत सहभाग घेणाºया जवळपास ३४ शाळांनी अल्पसंख्याक शाळांचा दर्जा प्राप्त करून या प्रक्रियेतून सूट मिळवली आहे. त्यामुळे या संस्थांमध्ये २५ टक्के आरक्षित जागांवर आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या संधी संपुष्टात आल्या आहेत.
शालेय शिक्षण विभागाकडून शिक्षणाचा हक्क कायदा २००९ अंतर्गत दरवर्षी आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी प्रवेशप्रक्रि या राबविली जाते. परंतु, गेल्या वर्षभरात काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यापासून ते वेगळ्या वर्गात बसविण्याच्या घटना घडल्यानंतर यावर्षी आरटीई प्रवेश प्रक्रियेतून तब्बल ३४ शाळांनी अल्पसंख्याक शाळांचा दर्जा प्राप्त करून घेत आरटीई प्रवेश प्रक्रियेतून काढता पाय घेतला आहे. विशेष म्हणजे या शाळांना आता अल्पसंख्याक समुदायांच्या शाळांना मिळणाºया सर्व सोयीसुविधा सरकारच्या अल्पसंख्याक मंत्रालयाकडून मिळणार आहेत. परंतु, केवळ अल्पसंख्याक शाळांचा दर्जा प्राप्त करून घेतल्यामुळे आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी मात्र या शाळांमध्ये मिळू शकणाºया शिक्षणापासून वंचित झाले आहेत.