३४ दुकानदारांचा सहभाग उघड

By admin | Published: December 27, 2015 12:09 AM2015-12-27T00:09:44+5:302015-12-27T00:14:27+5:30

रेशन धान्य घोटाळा : प्रमुख संशयित ठक्कर फरारच

34 shopkeepers' participation | ३४ दुकानदारांचा सहभाग उघड

३४ दुकानदारांचा सहभाग उघड

Next

नाशिक : राज्यातील बहुचर्चित वाडीवऱ्हे येथील रेशन धान्य घोटाळ्यात ३४ रेशन दुकानदारांचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात समोर आल्याचे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी शनिवारी (दि़२६) न्यायालयात सांगितले़ या घोटाळ्यातील काळा पैसा दडविण्यासाठी तयार करण्यात आलेली आणखी एक कंपनी समोर आली असून, तिच्याद्वारे कोट्यवधी रुपयांचे व्यवहारही झाले आहेत़ दरम्यान, या घोटाळ्यातील तिघा संशयितांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने वाढ केली असून, उर्वरित चौघांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे़
रेशन धान्य घोटाळ्यातील संशयित संपत घोरपडे, विश्वास घोरपडे, अरुण घोरपडे, मगन पवार, रमेश पाटणकर, काशीनाथ पाटील व ज्ञानेश्वर घुले यांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते़ विशेष सरकारी वकील मिसर यांनी न्यायालयात सांगितले की, या घोटाळ्यामध्ये ३४ रेशन दुकानदारांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे़ तसेच या धान्याची गुजरातमध्येही विक्री करण्यात आली असून, बनावट बिले व गाड्यांच्या नंबरप्लेट बदलून वाहतूक केल्याची कागदपत्रेही मिळाली आहेत़
रेशन धान्य अपहारासाठी तयार करण्यात आलेली बनावट बिले कोणी तयार केली, नंबरप्लेट बदलून किती धान्याची वाहतूक झाली, त्यामधील सहभाग या तपासासाठी संशयितांच्या कोठडीची मागणी अ‍ॅड़मिसर यांनी केली़ पोलीस कोठडीच्या मागणीच्या समर्थनार्थ त्यांनी न्यायालयाला सांगितले की, ज्या गुदामांमधून धान्याची वाहतूक करण्यात आली तिच्याशी संबंधित काही सरकारी अधिकारी यामुळे उजेडात येणार आहेत़ तसेच पुढील काही दिवसांत या घोटाळ्याचे चित्र स्पष्ट होणार असल्याचे सांगितले़ सरकारी वकिलांच्या मागणीनुसार न्यायालयाने संशयित अरुण घोरपडे, काशीनाथ पाटील व ज्ञानेश्वर घुले या तिघांच्या पोलीस कोठडीत आठ दिवसांची (१ जानेवारीपर्यंत) वाढ केली, तर उर्वरित संशयित संपत घोरपडे, विश्वास घोरपडे, मगन पवार, रमेश पाटणकर यांना ११ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी ठेवण्याचे आदेश दिले़ दरम्यान, या घोटाळ्यातील प्रमुख संशयित जितेंद्र ठक्करपर्यंत पोलीस अद्यापही पोहोचू शकलेले नाहीत़ (प्रतिनिधी)

Web Title: 34 shopkeepers' participation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.