३४६ आत्महत्याग्रस्त कुटुंबांना लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 11:30 PM2017-07-27T23:30:41+5:302017-07-27T23:31:07+5:30
कर्जमाफी : मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळ अधिवेशनात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या नावे असलेले कर्जमाफ करण्याची घोषणा केल्याने त्याचा लाभ जिल्ह्णातील ३४६ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विधीमंडळाच्या अधिवेशनात शेतकरी आत्महत्या, कर्जमाफीच्या प्रश्नावरून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडले असून, कर्जमाफीची तसेच दहा हजार रुपयांचे पीककर्ज देण्याची घोषणा करून महिना उलटला तरी त्याचा लाभ झाला नसल्याची तक्रार केली जात आहे. त्यावर सरकारनेही आपली भूमिका मांडताना ज्या शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा, नापिकीला कंटाळून आत्महत्या केली त्या कुटुंबीयांच्या नावे असलेले कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. शासनाच्या या घोषणेपूर्वी कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केली असली तरी, त्याच्या डोक्यावर असलेले कर्ज त्याच्या कुटुंबीयांच्या डोक्यावर कायम होते, किंबहुना सातबारा उताऱ्यावर कर्जाची नोंद असल्याने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना फेर कर्ज घेण्यास अडचणी येत होत्या.
चालू वर्षी ६४ आत्महत्याशेतकरी आत्महत्येच्या प्रमाणात वाढच होत असून, चालू वर्षी जानेवारी ते जुलैपर्यंत ६४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यापूर्वी सन २०११ (३४), २०१२ (१९), २०१३ (१५), २०१४ (४२), २०१५ (८५), २०१६ (८७) २०१७ (६४) शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. जिल्ह्णात गेल्या सहा वर्षांत ३४६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, सन २०१५ ते १७ या तीन वर्षांच्या काळात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. गेल्या वर्षी आत्महत्या करणाऱ्यांमध्ये महिलांचाही समावेश असल्याने तर अधिकच चिंता व्यक्त करण्यात आली होती. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्येच्या घटनांना रोखण्यात शासनाला अपयश आले आहे.