नाशिकमधील ३५०० डॉक्टर आज संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 01:59 PM2018-07-28T13:59:35+5:302018-07-28T14:02:30+5:30
शहरातील जिल्हा शासकिय रुग्णालये, महापालिकेची रुग्णालये तसेच ग्रामिण भागातील उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांवरुन वैद्यकिय सुुविधा सुरळीतपणे पुरविली जात असून रुग्णांनी या वैद्यकिय सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक व आरोग्य उपसंचालकांनी केले आहे.
नाशिक : राष्ट्रीय वैद्यकिय आयोग विधेयक लोकसभेत मांडले जाणार असून हे विधेयक देशातील वैद्यकिय क्षेत्र व त्यासंबंधीत सर्व घटकांचे नुकसान करणारे असल्याचा आरोप इंडियन मेडिकल असोसिएशन या डॉक्टरांच्या संघटनेने केला आहे. या विधेयकाला तीव्र विरोध दर्शविण्यासाठी संघटनेने राष्ट्रव्यापी संप पुकारला आहे. या संपात नाशिक शहरातील अडीच हजार व जिल्ह्यातील एक हजार असे एकूण साडे तीन हजार डॉक्टर सहभागी असल्याचा दावा संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. शहरासह जिल्ह्यातील बाह्यरुग्ण तपासणी आज खासगी डॉक्टरांकडून बंद ठेवण्यात आली आहे. शहरातील विविध डॉक्टरांच्या दवाखान्यांमध्ये ‘आज डॉक्टर संपावर’ असे सुचना फलक लावण्यात आले आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहे. बहुतांश नागरिकांना विनाआरोग्य तपासणी माघारी फिरावे लागत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनकडून शहरातील खासदार हेमंत गोडसे, हरिश्चंद्र चव्हाण यांना या विधेयकाच्या विरोधात निवेदन देण्यात आले आहेत. निवेदनासोबत विधेयकामधील हानीकारक तरतुदींचेपत्रही जोडण्यात आले आहेत. या विधेयकाबाबत शहरातील आयएमएच्या कार्यालयात सर्व सभासद डॉक्टरांची संयुक्त बैठक सुरू असून या बैठकीत विधेयक वैद्यकिय क्षेत्रासाठी कशा पध्दतीने मारक ठरणार आहे, यावर चर्चा सुरू आहे. हे राष्ट्रीय वैद्यकिय विधेयक श्रीमंती पोसणारे असून गरीबीवर यामुळे संकट येणार असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. शहरात अॅलोपॅथीद्वारे उपचार करणारे सुमारे सुमारे पाचशे रुग्णालये आहेत. तसेच दवाखान्यांची संख्या १ हजारावर आहे. वैद्यकिय विद्यार्थी संघटनेनेही संपाला पाठिंबा दिला आहे. यामुळे वैद्यकिय महाविद्यालयेदेखील आज बंद आहे. शहरातील जिल्हा शासकिय रुग्णालये, महापालिकेची रुग्णालये तसेच ग्रामिण भागातील उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांवरुन वैद्यकिय सुुविधा सुरळीतपणे पुरविली जात असून रुग्णांनी या वैद्यकिय सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक व आरोग्य उपसंचालकांनी केले आहे.