गंगापूर धरणात ३६ टक्के पाणीसाठा

By admin | Published: February 25, 2016 10:09 PM2016-02-25T22:09:05+5:302016-02-25T22:19:46+5:30

जलसंकट : एप्रिलमध्ये वितरणात अडथळ्यांची शर्यत

36 percent water stock in Gangapur dam | गंगापूर धरणात ३६ टक्के पाणीसाठा

गंगापूर धरणात ३६ टक्के पाणीसाठा

Next

 नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात दि. २२ फेब्रुवारी अखेर ३६ टक्के पाणीसाठा शिल्लक असून घटत चाललेल्या पाणीसाठ्यामुळे एप्रिलमध्ये महापालिकेला पाणी वितरणात अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून विभागवार एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवतानाच ३१ जुलैपर्यंत पाणी पुरविण्यासाठी धरणातून प्रतिदिन सुमारे दोन ते तीन दलघफू पाणी कमी उचलावे लागणार आहे. परिणामी, नाशिककरांना पाण्याची झळ सोसणे क्रमप्राप्त मानले जात आहे.
गंगापूर धरणातील जलसाठ्यात घट होत असून उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेता बाष्पीभवनाचेही प्रमाण वाढते राहणार असल्याने जलसंकट कायम आहे. गंगापूर धरणात दि. २२ फेब्रुवारी अखेर ३६ टक्के म्हणजे २०१० दलघफू इतका पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच तारखेला धरणात ३७५२ दलघफू म्हणजेच ६७ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. गंगापूर धरण समुहातील कश्यपी धरणात सद्यस्थितीत ५९० दलघफू म्हणजे ३२ टक्के, तर गौतमी गोदावरीत ७२ दलघफू म्हणजे अवघा ४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. संपूर्ण गंगापूर धरणसमुहात अवघा २९ टक्के पाणीसाठा आहे. तोच मागील वर्षी ६४ टक्के इतका होता. जलसंपत्ती नियामक प्राधिकरणच्या आदेशामुळे गंगापूर धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यात आले त्यावेळी गंगापूर धरणात सुमारे ७३ टक्के पाणीसाठा होता. आता फेब्रुवारी अखेर गंगापूर धरणातील पाणीसाठा निम्म्याहून खाली आला असून शहरावरील जलसंकट आणखी गडद होत चालले आहे. शासनाने दारणा धरणातील ५०० दलघफू पाणी आरक्षित ठेवले असले तरी महापालिकेने आतापर्यंत केवळ २०० दलघफूच्या आसपासच पाणी उचलले असून रोटेशन नसल्याने पाण्याचा उपसा जवळपास थांबविला आहे. त्यामुळे सारा ताण आता गंगापूर धरणावर येऊन पडला आहे. गंगापूर धरणाने आता तळ गाठायला सुरुवात केली आहे. धरणातील खडकाळ भाग आता वर डोकावू लागला असून येत्या एप्रिलमध्ये महापालिकेला पाणी उपसा करताना मोठ्या प्रमाणावर अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागण्याची भीती प्रशासकीय सूत्राने वर्तविली आहे.

Web Title: 36 percent water stock in Gangapur dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.