३६ हजार नवीन मिळकतींची नोंद
By admin | Published: June 22, 2017 12:37 AM2017-06-22T00:37:39+5:302017-06-22T00:37:56+5:30
नाशिक : महापालिकेने शहरात सुरू केलेल्या मिळकत सर्वेक्षणात आतापर्यंत २ लाख ९ हजार मिळकतींचा सर्व्हे पूर्ण झाला असून त्यात तब्बल ३६ हजार नवीन मिळकतींची नोंद झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : महापालिकेने शहरात सुरू केलेल्या मिळकत सर्वेक्षणात आतापर्यंत २ लाख ९ हजार मिळकतींचा सर्व्हे पूर्ण झाला असून त्यात तब्बल ३६ हजार नवीन मिळकतींची नोंद झाली आहे. याशिवाय, वाढीव बांधकामेही निदर्शनास आली आहेत. नवीन मिळकतींची नोंद झाल्याने महापालिकेला घरपट्टीच्या माध्यमातून सुमारे ५० कोटी रुपयांचा वाढीव महसूल मिळणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिली आहे.
महापालिकेने शहरातील मिळकतींचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याबाबतचे काम नवी दिल्ली येथील जिओ इन्फोसिस टेक्नॉलॉजिक्स या कंपनीला सहा महिन्यांसाठी देण्यात आले आहे. सदर कंपनीने १९ डिसेंबर २०१६ पासून प्रत्यक्ष सर्वेक्षणाला प्रारंभ केला. सध्या महापालिकेच्या दप्तरी चार लाख दहा हजार मिळकतींची नोंद आहे. जिआॅग्राफिकल सर्व्हेच्या माध्यमातून त्यात १५ ते २० टक्के मिळकतींची संख्या वाढण्याची अपेक्षा महापालिकेला आहे.
सर्व्हेमध्ये प्रामुख्याने वाढीव बांधकामे, अनधिकृत बांधकामे, वापरात बदल, भाडेकरू, टॅक्सनेटमध्ये नसलेल्या मिळकती यांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, मागील महिन्यात स्थायी समितीच्या बैठकीत मिळकत सर्वेक्षणाच्या प्रगतीबद्दल सभापतींनी विचारणा केली असता उपआयुक्त दोरकुळकर यांनी संबंधित एजन्सीला १८० दिवसांची मुदत सर्वेक्षणासाठी दिलेली असून, संथ गतीने सुरू असलेल्या कामाबाबत एजन्सीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असल्याचा खुलासा केला होता. त्यानुसार, बुधवारी (दि.२१) आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी मिळकत सर्वेक्षणाचा आढावा घेतला. त्यात आतापर्यंत १ लाख ६७ हजार मिळकतींचा प्रत्यक्ष सर्व्हे झाला असून, त्यात १ लाख ३१ हजार जुन्याच मिळकती आहेत तर नव्याने ३६ हजार मिळकतींची नोंद झालेली आहे. त्यामुळे महापालिकेला या मिळकतींच्या घरपट्टीच्या माध्यमातून सुमारे ५० कोटी रुपयांचा वाढीव महसूल प्राप्त होण्याची शक्यता आहे. याशिवाय, सर्वेक्षणात काही वाढीव व अनधिकृत बांधकामेही निदर्शनास आली आहेत. त्याबाबतही निर्णय घेतला जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.