जगात आढळले पोलिओचे ३७ रुग्ण
By admin | Published: January 29, 2017 12:54 AM2017-01-29T00:54:03+5:302017-01-29T00:54:16+5:30
मालेगाव : शेजारील राष्ट्रांकडून विषाणू भारतात येण्याची शक्यता
मालेगाव : रोटरीतर्फे १९८८ पासून पोलिओ निर्मूलन अभियान सुरू असून पाकिस्तान, अफगाण आणि नायजेरियात पोलिओचे रूग्ण आढळून येत आहेत. मागील वर्षभरात जगात ३७ पोलिओचे रूग्ण आढळून आले. शेजारील राष्ट्रांकडून पोलिओचे विषाणू भारतात प्रवेश करण्याची शक्यता असल्याने पोलिओ निर्मूलनासाठी प्रयत्न करण्याची मोहीम सुरू असल्याचे आंतरराष्ट्रीय रोटरीचे पोलिओ निर्मूलनासाठी भारत भेटीवर आलेले पथक प्रमुख अनिल गर्ग यांनी माहिती दिली. येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत गर्ग बोलत होते. गर्ग म्हणाले, जगभरात पोलिओसाठी रोटरी इंटरनॅशनलतर्फे खर्च करण्यात येतो. अमेरिकेत पोलिओचा नायनाट होऊन ५६ वर्ष झाली. रोटरीने १९८८ मध्ये पोलिओ निर्मूलन अभियान सुरू केले. पाकिस्तान, अफगाण आणि नायजेरिया येथे पोलिओचे रूग्ण आहेत. नायजेरियात ४ पोलिओ रूग्ण आढळले. दोन वर्षापूर्वी त्यांचेकडे एकही रूग्ण नव्हता. तीन वर्षे शून्य केसेस होत्या. मागील वर्षभरात जगात ३७ पोलिओचे रूग्ण आढळून आले. त्यापूर्वी भारतासह चार देशात पोलिओ रूग्ण आढळत होते. गेल्या पाच-सहा वर्षात भारतात एकही पोलिओ रूग्ण आढळून येत असल्याने तेथून ते भारतात प्रवेश करण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशात रोज ८०० मुले जन्माला येतात. व्हिसा घेण्यासाठी पोलिओचा डोस घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या सीमा रेषेवर पोलिओचे बुथ असून नेपाळमध्ये ८८ बुध आहेत. नेपाळमधून भारतात लोक कामासाठी ये-जा करीत असतात. ब्रम्हदेश, म्यानमार, बांगलादेशामध्येही रोटरीतर्फे पोलिओ निर्मूलनाचा कार्यक्रम जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने सुरू करण्यात आला आहे. भारतात फक्त रविवारी हा कार्यक्रम घेण्यात येतो. उत्तर प्रदेशात लोकसंख्या अधिक असून त्या पाठोपाठ मालेगावकडे अधिक लक्ष असतो. यात पोलिओ निर्मूलन मोहिमेसाठी प्रोत्साहन देणे व व्याप्ती वाढविण्यासाठी स्वत: पैसे खर्च करून शिष्टमंडळ २० तासांचा प्रवास करुन सरळ मालेगावात दाखल झाल्याचे शेवटी गर्ग यांनी सांगितले. जगातून पोलिओचा नायनाट झालेला नाही; मात्र नियमित लसीकरण हे गरजेचे आहे. आज भारत पोलिओ मुक्त आहे, असे म्हटले जाते. नियमित लसीकरण न केल्याने पोलिओचे विषाणू पुन्हा शिरकाव करून पोलिओचा उठाव होऊ शकतो. अशा परिस्थितीत भारतातच नव्हे संबंध जगात पोलिओचे पुनरागमन होऊ शकते, असे होऊ नये म्हणून गेल्या अनेक वर्षापासून रोटरी पोलिओ निर्मुलनाचे कार्य करीत आहे. आपण समाजाचे देणे लागतो ही भावना ठेवून भारताबद्दल असलेली आपुलकी व समाज बांधिलकी यामुळे पर्यटन न करता फक्त पोलिओ निर्मूलनात स्वत: सहभाग देऊन सर्व रोटरीयन स्वखर्चाने हे निरंतर कार्य करीत राहणार आहे.(वार्ताहर)