३७ हिस्ट्रीसिटर गुन्हेगारांना मतदानासाठी मज्जाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 01:09 AM2019-03-28T01:09:47+5:302019-03-28T01:10:03+5:30
राज्यातील विविध कारागृहांत झोपडपट्टी दादा प्रतिबंधात्मक कायद्यान्वये तसेच कॅफेपोसा कायद्याने बंदिस्त असलेल्या सराईत हिस्ट्रीसिटर गुन्हेगारांवर येत्या लोकसभा निवडणुकीत लक्ष ठेवण्याबरोबरच, ते निवडणुकीत कोणत्याही मार्गाने मतदान करणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने सर्व निवडणूक अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
नाशिक : राज्यातील विविध कारागृहांत झोपडपट्टी दादा प्रतिबंधात्मक कायद्यान्वये तसेच कॅफेपोसा कायद्याने बंदिस्त असलेल्या सराईत हिस्ट्रीसिटर गुन्हेगारांवर येत्या लोकसभा निवडणुकीत लक्ष ठेवण्याबरोबरच, ते निवडणुकीत कोणत्याही मार्गाने मतदान करणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने सर्व निवडणूक अधिकाऱ्यांना केल्या आहेत. त्यासाठी राज्याच्या गृह खात्याने मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना अशा गुन्हेगारांची यादीच सोपविली असून, ते कोणत्या तुरुंगात बंदिस्त आहेत, याचाही तपशील दिला आहे.
लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निवडणूक आयोगाने यंदा पहिल्यांदाच कारागृहात विविध गुन्ह्णात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांनाही मतदार नोंदणीचा हक्क बहाल केला होता. त्यासाठी कारागृह व्यवस्थापनाकडे मतदार नोंदणी अर्ज ठेवण्यात आले होते. कारागृहात बंदिस्त कैद्यांकडे त्यांचा रहिवास पुरावा, आधारकार्ड वा रेशनाकार्डाची दुय्यम प्रत अशी कागदपत्रे असल्यास त्याआधारे मतदार नोंदणी करण्याची संधी देण्यात आली होती. कैद्याने मतदार नोंदणीचा अर्ज भरून पोस्टाने त्याच्या मूळ मतदार संघातील गावात पाठविणे क्रमप्राप्त होते. अर्थात मतदार यादीत नाव आले म्हणून कारागृहात बंदिस्त कैद्याला मतदानाचा हक्क बजाविता येईल असे नाही. त्याचे नाव मतदार यादीत प्रसिद्ध झाले व मतदानाच्या तारखेच्या आत जर त्याची सुटका झाली तर मात्र त्याला मतदानापासून रोखता येणार नाही अशा स्पष्ट सूचना आयोगाने दिल्या आहेत; मात्र असे असले तरी, लोकसभा निवडणुकीत कोणत्याही गुंंड, गुन्हेगारांची दहशत चालणार नाही व मतदारांवर ते दबाव टाकू शकणार नाही, याची योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना आयोगाने पोलिसांना दिल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून निवडणुकीच्या तोंडावर राज्यात काही सराईत गुन्हेगारांवर झोपडपट्टी दादा प्रतिबंधक तसेच कॅफेपोसा कायद्यान्वये प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना राज्यातील विविध तुरुंगात ठेवण्यात आले आहेत. त्यात सांगली, नागपूर, वर्धा, औरंगाबाद, ठाणे, नाशिक या कारागृहांचा समावेश आहे. ३७ गुन्हेगार या कारागृहांमध्ये बंदिस्त आहेत, त्या त्या कारागृहांना अशा गुन्हेगारांची यादी पाठविण्यात आली असून, ते कारागृहातच असल्याबद्दल खात्री करण्याच्या सूचना आहेत. कोणत्याही परिस्थितीत ते मतदानाच्या दिवशी मतदान करणार नाहीत, याची काळजी सर्व लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
नाशिकरोड कारागृहात १६ कैदी
राज्यातील ३७ हिस्ट्रीसिटर कैद्यांपैकी नाशिकरोड कारागृहात १६ कैदी सध्या ठेवण्यात आले आहेत. त्यात प्रामुख्याने नागपूर, ठाणे, मुंबई, उल्हासनगर, अंबरनाथ, बांद्रा, कळवा येथील गुन्हेगारांचा समावेश आहे.