महापालिकेच्या ३७ शाळांचे विलीनीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:28 AM2018-04-22T00:28:19+5:302018-04-22T00:28:19+5:30
महापालिका शाळांच्या पडताळणीनंतर अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती आणि पटावरील विद्यार्थ्यांची संख्या यात तफावत आढळून आल्याने एकूण ३७ शाळांचे जवळच्याच मनपाच्या शाळांमध्ये विलीनीकरणाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मनपा शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी दिली आहे. या निर्णयामुळे नव्याने शिक्षकांच्या नियुक्तीचाही प्रश्न संपुष्टात आला आहे.
नाशिक : महापालिका शाळांच्या पडताळणीनंतर अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती आणि पटावरील विद्यार्थ्यांची संख्या यात तफावत आढळून आल्याने एकूण ३७ शाळांचे जवळच्याच मनपाच्या शाळांमध्ये विलीनीकरणाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मनपा शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी दिली आहे. या निर्णयामुळे नव्याने शिक्षकांच्या नियुक्तीचाही प्रश्न संपुष्टात आला आहे. महानगरपालिका नाशिक शिक्षण विभागाच्या १०९ मराठी, ४ हिंदी व १३ उर्दू माध्यमांच्या एकूण १२६ शाळा आहेत. सदर शाळांमध्ये एकूण २९ हजार विद्यार्थी शालेय शिक्षण घेत आहेत. एकूण ९४० शिक्षक अध्यापनाचे कामकाज करत आहेत. या शाळांची गेल्या काही दिवसांपासून शिक्षण विभागामार्फत पडताळणी सुरू होती. या पडताळणीत काही शाळांमध्ये प्रत्यक्ष उपस्थिती, पटावरील विद्यार्थ्यांच्या प्रमाणात तफावत आढळून आली. शासन निकषानुसार इयत्ता पहिलीचा वर्ग असलेल्या दोन शाळांमधील अंतर किमान १ कि.मी. असणे आवश्यक आहे. तथापि, महानगरपालिकेच्या काही शाळा त्यापेक्षा कमी अंतरात किंवा एकाच आवारात असल्याने विद्यार्थी पट व उपस्थिती यात तफावत आढळून आली. शासन निकषानुसार ३० विद्यार्थ्यांच्या प्रमाणात एक शिक्षक देय आहे. शालेय इमारत व पुरेशा वर्गखोल्या उपलब्ध असताना वेगवेगळ्या ठिकाणी शाळा भरविणे विद्यार्थ्यांच्या वयोगटाचा विचार करता संयुक्तिक ठरत नसल्याचेही लक्षात आले. त्यामुळे शाळेतील पटावरील विद्यार्थी, प्रत्यक्ष उपस्थिती, शिक्षक व विद्यार्थ्यांचचे गुणोत्तर प्रमाण, उपलब्ध इमारती व वर्गखोल्या, दोन शाळांमधील असलेले प्रत्यक्ष अंतर लक्षात घेऊन सर्व १२६ शाळांमधील कमी पट व अल्प उपस्थितीच्या शाळांचे जवळच्या अथवा त्याच आवारातील अस्तित्वातील शाळेमध्ये विलीनीकरण करून शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची बाब विचाराधीन होती.
१ मेपासून अंमलबजावणी
सदर निर्णयाची अंमलबजावणी १ मे २०१८ पासून करण्यात येणार आहे. यातील नियोजनानुसार मूळ शाळेतील विद्यार्थी जवळच्या विलीनीकरण होणाऱ्या शाळेत दाखल करून त्या शाळेतील सर्व कागदपत्रे, मूळ रेकॉर्ड आणि सर्व भौतिक साहित्य समायोजित शाळेत जमा करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांना देण्यात आली आहे. महाराष्ट्र दिनाच्या दिवशी पालकांच्या सभेमध्ये याबाबत माहिती देऊन १५ जून २०१८ रोजी सदरचे विद्यार्थी त्या-त्या संबंधित शाळेत उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात येणार आहे.