नाशिक शहरात यंदा ३७ मौल्यवान गणेश मंडळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 01:18 AM2018-09-22T01:18:02+5:302018-09-22T01:18:24+5:30
: यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवात शहरातील १७२ मोठ्या गणेश मंडळांनी ‘श्रीं’ ची प्रतिष्ठापना केली असून, यापैकी ३७ गणपती हे मौल्यवान असल्याची माहिती विशेष शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम कोल्हे यांनी दिली़
नाशिक : यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवात शहरातील १७२ मोठ्या गणेश मंडळांनी ‘श्रीं’ ची प्रतिष्ठापना केली असून, यापैकी ३७ गणपती हे मौल्यवान असल्याची माहिती विशेष शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम कोल्हे यांनी दिली़ पोलीस आयुक्तालय हद्दीतील तेरा पोलीस ठाणेनिहाय लहान मोठ्या गणेश मंडळांनी ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना करून पोलिसांकडे नोंदणी केली आहे. त्यानुसार यावर्षी १७२ मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांनी, तर ५९४ लहान गणेश मंडळांनी ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना केली आहे. यामध्ये यंदा ३७ मौल्यवान गणपती असून, यामध्ये रविवार कारंजावरील रविवार कारंजा मित्रमंडळ, शिवप्रकाश नवप्रकाश मित्रमंडळ (नाशिकचा राजा), मुंबई नाक्यावरील युवक मित्रमंडळ, उपनगर परिसरातील बालाजी फाउंडेशन, भद्रकालीतील भद्रकाली कारंजा मित्रमंडळ, राजमुद्रा मित्रमंडळ, सत्यम सांस्कृतिक मंडळ, जाणता राजा मित्रमंडळ आदी सार्वजनिक मंडळांचा समावेश आहे. गेल्यावर्षी शहरात १७९ मोठ्या, तर ५६७ लहान गणेश मंडळांनी श्रींची प्रतिष्ठापना केली होती. त्यामध्ये ३९ मौल्यवान गणपती होती. पोलिसांनी मौल्यवान श्रींच्या सुरक्षिततेची जबाबदारी संबंधित मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवर सोपविलेली आहे. शहरातील भद्रकाली पोलीस ठाण्यात सर्वाधिक नऊ मौल्यवान गणेश मंडळे आहेत.
शहरातील मौल्यवान गणेश मंडळांची संख्या
भद्रकाली पोलीस ठाणे - ९ , देवळाली कॅम्प पोलीस ठाणे - ७ , सरकारवाडा पोलीस ठाणे - ६, पंचवटी पोलीस ठाणे - ४, सातपूर पोलीस ठाणे - ३, अंबड पोलीस ठाणे - ३ , उपनगर पोलीस ठाणे - २ , मुंबई नाका पोलीस ठाणे - २ , गंगापूर पोलीस ठाणे - १, एकूण - ३७