३८ गाव योजनेची उपसचिवांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 01:29 AM2019-05-20T01:29:16+5:302019-05-20T01:29:44+5:30
जागतिक बँकेने गौरविलेल्या व तेलंगणा राज्याने आत्मसात केलेल्या येथील ३८ गाव नळ पाणीपुरवठा योजनेतील केंद्र शासनाच्या पाणीपुरवठा विभागाचे उपसचिव अजित शुक्ला यांनी पाहणी केली. विशेष म्हणजे अभ्यासासाठी या योजनेची पाहणी करण्यात आली असून, योजनेच्या कामकाजाचे त्यांनी कौतुकही केले.
येवला : जागतिक बँकेने गौरविलेल्या व तेलंगणा राज्याने आत्मसात केलेल्या येथील ३८ गाव नळ पाणीपुरवठा योजनेतील केंद्र शासनाच्या पाणीपुरवठा विभागाचे उपसचिव अजित शुक्ला यांनी पाहणी केली. विशेष म्हणजे अभ्यासासाठी या योजनेची पाहणी करण्यात आली असून, योजनेच्या कामकाजाचे त्यांनी कौतुकही केले.
टँकरग्रस्त असलेल्या ३८ गावांना टँकरमुक्त करण्यासाठी कार्यान्वित केलेल्या या योजनेने सद्यस्थितीत ५६ गावांना टँकरमुक्त केले आहे. विशेष म्हणजे ही योजना शासन नव्हे तर लोकप्रतिनिधींची व्यवस्थापन समिती चालवित आहे. अनेक योजना तोट्यात असताना ही योजना मात्र नफ्यात सुरु आहे.
यामुळे हैदराबाद येथे झालेल्या जागतिक बँकेच्या कार्यशाळेत या योजनेचा देशातील अव्वल योजना म्हणून दोन वर्षांपूर्वी गौरव झालेला आहे. तसेच तेलंगणा, आंध्र प्रदेश येथील जिल्हा परिषदांचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या एका समितीने योजनेची पाहणी केली होती. त्यानंतर या योजनेच्या धर्तीवर आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यातील सर्व पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सध्या दुष्काळी स्थिती असतानाही योजनेने ५६ गावांना पाणीटंचाईची झळ नाही. त्यामुळेच शुक्ला योजनेचा अभ्यास करण्यासाठी आले होते. त्यांनी बाभूळगाव येथील योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्राची तसेच साठवण तलावाची पाहणी केली. किती लोकांची तहान ही योजना भागविते, दिवसाला किती पाणी दिले जाते, ग्रामपंचायतीकडून पाणीपट्टी आकारणी कशी केली जाते, वसुली कशी होते, योजनेचा खर्च काय आहे, यासंदर्भातील माहिती त्यांनी घेतली. तसेच त्यांनी नांदेसर ग्रामपंचायतीलाही भेट दिली.