महामार्गावर अडविलेले ३९ परप्रांतीय अडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 09:49 PM2020-05-05T21:49:06+5:302020-05-05T23:13:11+5:30
दिंडोरी तालुक्यात विविध औद्योगिक कंपन्यांमध्ये तसेच बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार असून, लॉकडाउनमुळे कंपन्या, बांधकामे बंद झाल्याने कामगारांवर बेकारीची कु-हाड कोसळत त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असताना त्यांना विविध सामाजिक संस्थांनी मदतीचा आधार देत पोटाची खळगी भरण्यास मदत केली.
दिंडोरी (भगवान गायकवाड) : तालुक्यात विविध औद्योगिक कंपन्यांमध्ये तसेच बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार असून, लॉकडाउनमुळे कंपन्या, बांधकामे बंद झाल्याने कामगारांवर बेकारीची कु-हाड कोसळत त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असताना त्यांना विविध सामाजिक संस्थांनी मदतीचा आधार देत पोटाची खळगी भरण्यास मदत केली. प्रशासनाने दिंडोरी व वणी येथे परप्रांतीयांसाठी शेल्टर होम सज्ज ठेवले आहे. दिंडोरीत अद्याप कोणत्याही मजुरांना शेल्टर होमचा आसरा घेण्याची गरज पडलेली नाही. मात्र उत्तर प्रदेशमध्ये जाणाऱ्या ३९ परप्रांतीयांना राष्ट्रीय महामार्गावर अडवत त्यांना वणी येथील महाविद्यालयातील निवारागृहात ठेवण्यात आले असून, त्यांना विविध सामाजिक संस्थांनी सर्व गरजू वस्तू पुरवत आधार दिला आहे.
लॉकडाउन जाहीर होताच दुसºयाच दिवशी प्रांताधिकारी डॉ. संदीप आहेर यांनी दिंडोरी व वणी येथे सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक बोलावत लॉकडाउनमुळे ज्या नागरिकांना मदत करणे आवश्यक आहे त्यांना मदतीचे आवाहन केले. त्यानुसार दिंडोरीत अनेकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येत अन्नधान्य दान केले. दिंडोरी नगरपंचायतच्या माध्यमातून १४०० लोकांना जीवनावश्यक किराणा साहित्य वाटण्यात आले. ज्या कंपनीत कामगार काम करत होते त्या कंपन्यांनीही त्यांचे ठेकेदारांमार्फत कामगारांच्या जेवणाची व्यवस्था केली. दिंडोरीतील कापड व्यापारी संघटनेने टॉवेल, बेडशीट, चादर, ब्लॅँकेटची मदत केली तर किराणा व्यापारी असोसिएशनने किराणा साहित्य व अत्यावश्यक किट दिले. शहरातील ९० दिव्यांग बांधवांना किराणा मालाचे किट देण्यात आले.
दरम्यान, नाशिक आग्रा महामार्गावरून एक टेम्पोत परप्रांतीय मजूर उत्तर प्रदेश, बिहारकडे जात असताना पोलिसांनी त्यांचा टेम्पो जवळके दिंडोरी दहावा मैल परिसरात पकडला व त्यांना दिंडोरीत आरोग्य तपासणी करून वणी येथील महाविद्यालयातील शेल्टर होममध्ये ठेवण्यात आले आहे. वणी येथील संख्येश्वर तीर्थ ट्रस्ट व शिवभोजन थाळी यांच्याकडून जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे तर शहरातील विविध सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी यांनी टॉवेल, टूथपेस्ट, ब्लॅँकेट चादर आदींची व्यवस्था केली आहे. सरकारी पातळीवरून कोणतीही मदत नसताना प्रांताधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार कैलास पवार आदींनी नागरिकांच्या मदतीने कोरोनाच्या लढ्यात लॉकडाउनमुळे अडकलेल्या नागरिकांना आधार देत त्यांची सोय केली आहे.
--------------------------------
पायी जाणाºया मजुरांना जेवण
राष्ट्रीय महामार्गावरून दररोज शेकडो मजूर आपल्या गावी पायी जात आहे. त्यांना जवळके दिंडोरी येथे तुकाराम जोंधळे यांनी ग्रामस्थांच्या सहकार्यातून जेवण व पाण्याची व्यवस्था केली असून, अविरपणे ही सेवा सुरू आहे.
-----------------------------
अनेक मजुरांना गावाची ओढ
४काही कंपन्या व बांधकामे चालू झाली आहेत. मात्र कामगारांना मूळगावी जाण्याचे वेध लागले असून, गावी जाण्यासाठी पास मिळावा यासाठी तलाठी कार्यालयात परप्रांतीय गर्दी करताना दिसून येत आहेत
------------------------------
मुंबईत सर्व काम बंद असल्याने आमचे हाल होत होते म्हणून आम्ही आमच्या गावी पायी चाललो होतो. त्यात एक गाडीला हात दिला. त्यांनी गाडीत घेतले; परंतु पोलिसांनी आम्हाला अडवून वणी येथे आणले. मात्र येथे आमची जेवणाची - राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासनाचे व जनतेचे आभार मानतो. आता आम्हाला उत्तर प्रदेशाकडे जाणाºया रेल्वेने आमच्या गावी जाण्यासाठी व्यवस्था करावी.
- शिवप्रसाद यादव,
परप्रांतीय मजूर