चार दिवसांतील ३९ चाचण्या निगेटिव्ह, महापालिकेतर्फे सतर्कता
By Suyog.joshi | Published: December 27, 2023 08:00 PM2023-12-27T20:00:47+5:302023-12-27T20:01:11+5:30
महापालिकेच्या आरोग्य विभागाने बिटको रुग्णालयात अँटिजन तपासणीची सुविधा उपलब्ध केली आहे.
नाशिक - कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे विशेष दक्षता घेण्यात येत असून आतापर्यंतच्या ३९ रॅपिड अँटिजन टेस्ट निगेटिव्ह आल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण यांनी दिली. बुधवारी जेडीसी बिटको रुग्णालयात १२, स्वामी समर्थ रुग्णालयात १ तर सिडकोच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात केलेली १ अशी १४ टेस्ट निगेटिव्ह आल्या. तत्पूर्वी मंगळवार सायंकाळपर्यंत २५ टेस्ट निगेटिव्ह आल्या होत्या.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने बिटको रुग्णालयात अँटिजन तपासणीची सुविधा उपलब्ध केली आहे. देशात पुन्हा कोरोनाच्या नव्या काही भागात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण मिळून आल्याने केंद्राच्या आरोग्य विभागाने राज्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागानेही विशेष खबरदारी म्हणून तयारीला सुरुवात केली असून सुमारे ४०० बेडसह ऑक्सिजन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. आरोग्य विभागासह मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आले. महापालिकेचे बिटको व डॉ. जाकीर हुसैन रुग्णालय मिळून एकूण चारशे बेड सज्ज ठेवण्यात आले आहे. तर गरज पडली तर अँटिजनसह आरटीपीसीआर तपासणी देखील करण्यात येणार आहे.
बिटको व डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील डॉक्टर, अधिकाऱ्यांना रोजच्या रोज मनपा मुख्यालयाकडे अहवाल देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी घाबरू नये, सतर्कता बाळगावी. मनपाच्यावतीने सर्व रुग्णालयांमध्ये उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पुरेसे ऑक्सिजन साठ्यासह जंबो सिलिंडरही उपलब्ध आहेत. सर्दी, खोकला, अंगदुखी अशी लक्षणे आहेत.
- डॉ. तानाजी चव्हाण, आरोग्य अधिकारी, मनपा