३९ हजार मतदार वाढले
By admin | Published: January 22, 2015 12:24 AM2015-01-22T00:24:09+5:302015-01-22T00:24:09+5:30
अंतिम यादी जाहीर : केंद्रावर पाहण्यासाठी उपलब्ध
नाशिक : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये करण्यात आलेल्या मतदार पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी मोहिमेत जिल्ह्यात ३९ हजारांनी मतदारांमध्ये वाढ झाली असून, बुधवारी जिल्हा निवडणूक शाखेने विधानसभा मतदारसंघनिहाय अंतिम मतदार यादी जाहीर केली आहे. मतदारांना पाहण्यासाठी प्रत्येक केंद्रावर ही यादी ठेवण्यात येणार आहे.
१ डिसेंबर २०१४ रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर केल्यानंतर त्यावर दावे व हरकती मागविण्यात आल्या. त्यावर सुनावणीही घेण्यात आली. दरम्यान, या मोहिमेत नवीन मतदारांची नोंद, स्थलांतरित, दुबार व मयत मतदारांची नाव वगळणी यासाठी विशेष मोहिमा राबविण्यात येऊन मतदार यादी अद्ययावत करण्यात आली. नवीन मतदारांची नोंदणी करताना त्यांची छायाचित्रेही जमा करण्यात आल्याने अंतिम मतदार यादी छायांकित झाली आहे. बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या मतदार यादीनुसार आता जिल्ह्णातील मतदारांची संख्या ४१ लाख ६८ हजार ६७९ इतकी झाली असून, यापुढे निरंतर नावनोंदणी प्रक्रिया विधानसभा मतदारसंघनिहाय सुरूच राहणार असल्याने या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर महिनाभरात ३९ हजार ७६५ नवीन मतदारांची त्यात भर पडली आहे, तर ७८७२ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. नवीन मतदार यादी मतदारांना पाहण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर ठेवण्यात आली असून, प्रत्येक मतदार ती पाहून आपले नाव असल्याची खात्री तसेच त्यातील त्रुटींबाबत कार्यवाही करू शकणार आहे.