जिल्ह्यात ४ टक्के बाधित रुग्ण १६ वर्षांखालील !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:15 AM2021-04-20T04:15:10+5:302021-04-20T04:15:10+5:30

नाशिक : काेरोनाच्या पहिल्या लाटेत संसर्ग हा प्रामुख्याने घरांतील ज्येष्ठांसह मध्यमवयीन लोकांना अधिक व्हायचा. त्यावेळी सोळा वर्षांखालील मुला-मुलींना संसर्ग ...

4% infected patients under 16 years in the district! | जिल्ह्यात ४ टक्के बाधित रुग्ण १६ वर्षांखालील !

जिल्ह्यात ४ टक्के बाधित रुग्ण १६ वर्षांखालील !

Next

नाशिक : काेरोनाच्या पहिल्या लाटेत संसर्ग हा प्रामुख्याने घरांतील ज्येष्ठांसह मध्यमवयीन लोकांना अधिक व्हायचा. त्यावेळी सोळा वर्षांखालील मुला-मुलींना संसर्ग झाल्याचे प्रकार अल्प होते. मात्र, दुसऱ्या कोरोना लाटेत बालकांमध्ये संसर्गाची लक्षणे आढळण्याच्या प्रमाणात मोठीच वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यातील लहान मुलांना ताप, घसादुखी, खोकला अशी सौम्य लक्षणे आढळली असली, तरी त्यांच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी सामान्य होती. त्यामुळे जिल्ह्यात सध्या उपचारार्थी ३८ हजारांहून अधिक नागरिकांपैकी सुमारे १,५०० बालकांना कोरोना झाला, तरी त्यातील बहुतांश बालकांना ॲडमिट करावे लागले नाही. मात्र, एप्रिलच्या प्रारंभापासून बालकांना ॲडमिट करावे लागण्याच्या प्रमाणातही एप्रिलच्या प्रारंभापासून लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

ज्यांच्या घरातील पालक पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, त्यांच्या घरांमध्ये मुले बाधित झाल्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले. त्यात अत्यल्प आणि अल्प उत्पन्न असणाऱ्यांचा मोठा समावेश आहे. त्याशिवाय मुलांमध्ये सौम्य स्वरूपाची लक्षणे आढळण्याचा पॅटर्न दिसून आला. अनेक बालकांमध्ये बारीकसा ताप, थोडेसे गरगरणे, खोकला व घसादुखी अशी सौम्य लक्षणे होती. नव्या कोरोना व्हायरस संबंधात जे संशोधन नव्याने पुढे आले, त्यात असे आढळले की, लहान मुलांना याची लागण होण्याचे प्रमाण कमी असले, तरी काहींना त्यात प्राणही गमवावा लागला आहे. नाशिक जिल्ह्यात १६ वर्षांखालील वयोगटांतील ११ मुला-मुलींचे मृत्यू झाले आहेत.

इन्फो

मास्कबाबतचे निर्देश

सध्याच्या स्थितीत मास्क वापराबाबत डब्ल्यूएचओने स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यानुसार, दोन ते तीन वर्षांपुढील सर्व वयोगटांतील मुलांना कुटुंबीयांनी मास्क घालणे आवश्यक आहे. सध्याची परिस्थिती पाहता, तर सर्व बालकांनी नियमितपणे मास्क घालणे आवश्यक असल्याचे त्यांनी दिलेल्या दिशानिर्देशात नमूद केले आहे.

इन्फो

मुलांचे बाधितचे प्रमाण अधिक

आतापर्यंतच्या बाधित मुला-मुलींमध्ये मुले बाधित असण्याचे प्रमाण दीडपटीपेक्षा थोडे कमी आहे. आतापर्यंत ० ते १६ वयोगटात ४७१६ बालके तर ३,६१० बालिका बाधित झाल्या होत्या. त्यामुळे एकूणच बाधितांमध्ये घराबाहेर, कॉलनीत, सोसायटीत खेळणाऱ्या मुलांचेच प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे.

कोट

लहान मुलांमध्ये कोरोनाची अगदी सामान्य लक्षणे होती. जुलाबासह न उतरणारा ताप हेही एक कोरोनाचे लक्षण आढळून आले आहे, तसेच सर्दी, ताप यांसारखी सामान्य लक्षणेही दिसून आली. मात्र, त्यात बालके दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. एकूणात या दुसऱ्या कोरोना लाटेत बालके बाधित होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत असल्याने अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.

डॉ.पंकज गाजरे, जिल्हा रुग्णालय

Web Title: 4% infected patients under 16 years in the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.